मुंबई - शहरात आणि महापालिकेच्या विविध कार्यालयात ईडीने अनेक ठिकाणी धाडी टाकल्या आहेत, त्यात शिवसेनेच्या अनेक नेत्यांच्याही घरी धाड टाकण्यात आली आहे. कोविड घोटाळ्याच्या नावाखाली टार्गेट केले जातेय. जे शिंदे गटात गेलेत ते मुख्य लाभार्थी आहेत, त्यांना का वगळले? खरोखरच चौकशी करायची असेल तर सगळ्यांची करा, दुसऱ्या गटात जाऊन कातडी वाचवतायेत त्या सगळ्यांची चौकशी करा, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या प्रतिक्रियेला प्रत्युत्तर देताना राऊत यांनी काही नेत्यांची नावे घेऊन यांची चौकशी करण्याचीही मागणी केलीय.
शिवसेनेच्या प्रमुख लोकांवर कारवाई करायची. ही राजकीय सूडाची कारवाई आहे. आम्ही या कारवाईला हिंमतीने सामोरे जायला तयार आहोत. अनिल परब, रवींद्र वायकर, मी स्वत: आम्ही सामोरे गेलोत, भविष्यात सत्ता बदलली तर फासे उलटे पडू शकतात असा इशारा संजय राऊत यांनी भाजपा-शिवसेनेला दिला होता. त्यानंतर, आज राऊत यांनी काही भाजप नेत्यांची नावे घेतली असून त्यांच्याबद्दल आपण ईडीकडे तक्रार केली आहे. तसेच, गृहमंत्री फडणवीस यांच्याकडेही लेखी तक्रार केल्याचं सांगितलं.
झाकिर नाईक ज्याच्यावर केंद्र सरकारकडून टेरर फंडींगचे आरोप आहेत, त्याच्याकडून गृहमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या त्यांच्याच पक्षाच्या नेत्याच्या खात्यात साडेचार कोटी रुपये कसे येतात हे गृहमंत्र्यांना माहित नसेल तर आम्ही द्यायला तयार आहोत, असे संजय राऊत यांनी म्हटले. यावेळी, भाजप नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या खात्यात ते पैसे आल्याचेही राऊत यांनी म्हटले.
दादा भुसे हे राज्य सरकारध्ये मंत्री आहेत, पण भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारासंदर्भात देवेंद्र फडणवीस हे नाकाने कांदे सोलत होते. राधाकृष्ण विखे पाटलांनी गणेश सहकारी साखर कारखान्यात भ्रष्टाचार केला म्हणूनच त्यांचा पराभव झाला. भाजपच्याच लोकांनी पराभव केलाय. झाकीर नाईक हा राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संस्थांना साडे चार कोटी रुपये का देतो? याची चौकशी करण्याची फडणवीसांची हिंमत आहे का? असा सवालही संजय राऊत यांनी विचारला आहे. तसेच, गृहमंत्र्यांनी ईडीला पत्र लिहून राधाकृष्ण विखे पाटील यांना साडे चार कोटी रुपये झाकीर नाईकच्या खात्यातून कसे आले याची चौकशी करावी. भाजपचे आमदार राहुल कुल यांच्याकडून ५०० कोटींची मनी लाँड्रिंग केल्याचा आरोपही राऊत यांनी केला. तर फडणवीस काय करत आहेत? यावर काही भाष्य करा, असेही राऊत यांनी म्हटले.