Join us

७ ते १२ बंदी असताना अवजड वाहने मुंबईमध्ये येतातच कशी?; नियमांचे उल्लंघन, पोलिसांचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2023 10:42 AM

नियमांचे उल्लंघन, ओव्हरलोड वाहनांची वाहतूक, पोलिसांचे होतेय दुर्लक्ष

मुंबई :  मुंबईतील प्रत्येक रस्त्यावर वाहनांच्या रांगा, वाहतूककोंडी आहे. याचा चालकांना जसा त्रास होतो तसा सामान्य मुंबईकरही बेजार होऊन जातो. यावर तोडगा काढण्यासाठी वाहतूक पोलिसांनी सकाळी सात ते रात्री १२ पर्यंत अवजड वाहनांना मुंबईत प्रवेशबंदी केली आहे. तरीही ही वाहने शहरात बंदीच्या काळात फिरताना दिसतात. नियमांचे उल्लंघन होऊनही त्याकडे सर्रास दुर्लक्ष केले जात आहे. केवळ बंदीकाळात वाहने येत नाही तर ओव्हरलोड वाहनांचीही वाहतूक सुरू असते. सकाळ, संध्याकाळ कोंडी होत असल्याने नोकरदारांना ऑफिस आणि घरी जाण्यास नेहमी उशीर होतो.   

मुंबईत  मेट्रोच्या कामांमुळे रस्ते अनेक ठिकाणी खोदले असल्याने वाहतुकीच्या मार्गिका कमी झाल्या आहेत. काही रस्ते एक दिशामार्ग केले आहेत तर काही ठिकाणची वाहतूक अन्य मार्गावरून वळविली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी  अवजड वाहनांना शहरात प्रवेश करण्यासाठी वेळापत्रक आखून दिले आहे. सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्यावेळी प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तसेच काही मार्गावर प्रवेशबंदी आहे. मात्र, तरी त्या मार्गावरून मालवाहतूक केली जाते. 

मुंबई महानगर परिसरात अवजड वाहनांच्या भार क्षमतेपेक्षा जास्त वाहतुकीबाबत वायुवेग पथकाला वेळोवेळी सूचना देण्यात येतात. त्यानुसार कारवाई केली जाते.  याबाबतचा अहवाल प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून मागविण्यात येईल. भार क्षमतेपेक्षा जास्त वाहतुकीबाबत आणखी कठोर कारवाई केली जाईल. - जे. बी. पाटील, सहआयुक्त, परिवहन विभाग 

मुंबईत अवजड वाहनांना वाहतुकीचे नियम निश्चित करण्यात आहेत. उल्लंघन केले जात असेल तर संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश देण्यात येतील.- एम. रामकुमार, अपर पोलिस आयुक्त

काय आहे वाहतूक पोलिसांचा आदेश? 

दक्षिण मुंबईत अवजड वाहनांना  सकाळी सात ते रात्री १२ पर्यंत प्रवेशबंदी आहे. या वाहनांना रात्री एकनंतर सकाळी सातपर्यंत जाण्यास परवानगी आहे. तर दक्षिण मुंबई वगळता अन्य भागांत अवजड वाहनांना सकाळी सात ते ११ आणि सायंकाळी पाच ते १० या वेळेत प्रवेशावर निर्बंध आहेत. या आदेशातून आपत्कालीन वाहने आणि सरकारी वाहने, एसटी, बेस्ट, स्कूल बस, प्रायव्हेट कंपन्यांच्या कर्मचारी बस, अत्यावश्यक सेवा देणारी वाहने, पोलिस, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्यांना यातून सूट देण्यात आली आहे.  

वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, इस्टर्न एक्सप्रेस हायवे, फ्री वे  मार्गावर  अवजड वाहतूक सुरू आहे. ती वाहने भारक्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करतात.  त्यामुळे रस्त्याचे नुकसान आणि अपघाताचा धोका आहे. मात्र, त्याकडे परिवहन विभागाचे दुर्लक्ष होत आहे. - प्रदीप वाघमारे, अवजड वाहतूक विभागप्रमुख, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना

टॅग्स :वाहतूक पोलीसमुंबई