Join us

व्हिसा असलेला माझा पासपोर्ट मला कसा परत मिळेल?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 12:19 PM

US काउन्सलेटच्या सहकार्याने

प्रश्न : माझा यू. एस. व्हिसा अर्ज मंजूर झाला आहे. व्हिसा असलेला माझा पासपोर्ट मला कसा परत मिळेल? 

उत्तर : व्हिसा अर्ज सादर करण्यापूर्वी तुम्हाला पासपोर्ट परत कसा हवा आहे, याचा पर्याय ऑनलाइन प्रोफाइल तयार करतेवेळी द्यावा लागतो. व्हिसा जारी झाल्यानंतर तुम्हाला दोन प्रकारे पासपोर्ट मिळू शकतो. तो स्वतः स्वीकारणे किंवा नमूद पत्त्यावर प्राप्त करून घेणे. या दोन्ही पर्यायांपैकी तुम्ही कोणता पर्याय निवडता ते सर्वात महत्त्वाचे आहे. व्हिसा मंजूर झाल्यानंतर यू. एस. कौन्सुलेट त्यात व्हिसा लावण्यासाठी पासपोर्ट ठेवते. एकदा पासपोर्टमध्ये व्हिसा लागला की, तुम्हाला एसएमएस येतो आणि तुमचा पासपोर्ट तयार असून, तुम्ही पासपोर्ट स्वीकारण्यासाठी जो पर्याय निवडला आहे, त्या संदर्भात ई-मेलदेखील येतो. तुम्हाला लवकरात लवकर पासपोर्ट देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. तुम्हाला कौन्सुलेटने काही सूचना केली नसेल तर पासपोर्ट एक ते दोन आठवड्यांत तुम्हाला प्राप्त होतो.

प्रश्न : पासपोर्ट मी कसा पिक-अप करू? 

उत्तर : तुमचा व्हिसा असलेला पासपोर्ट तुम्हाला ३३ व्हिसा केंद्रांपैकी तुम्ही निवडलेल्या एका ठिकाणी निःशुल्क पाठविला जातो. जर तुम्ही व्हिसा ॲप्लिकेशन सेंटरमधून पासपोर्ट स्वीकारण्याचा पर्याय निवडला असेल तर तुम्हाला तेथून तुमचे सरकारी ओळखपत्र दाखवून तो प्राप्त करून घेता येईल. जर तुम्ही मित्र अथवा कुटुंबाच्या वतीने पासपोर्ट स्वीकारणार असाल तर त्यांचे प्राधिकार पत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. त्याचसोबत तुमचे स्वतःचे ओळखपत्र आणि जर अर्जदार १८ वर्षांच्या खालील असेल तर त्याचा जन्मदाखला किंवा शाळेचे ओळखपत्र सोबत असणे बंधनकारक आहे.

प्रश्न : माझा पासपोर्ट माझ्यापर्यंत कसा डिलिव्हर होईल? 

उत्तर : तुम्हाला प्रीमियम कुरियरच्या माध्यमातून तुमचा पासपोर्ट हवा असेल तर तुम्हाला प्रति अर्ज ६५० रुपये अतिरिक्त भरावे लागतील. याकरिता डिजिटल पेमेंट पद्धतीने पैसे द्यावे लागतील. या पैशांची पावती तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर पाठविली जाईल. जर तुम्हाला अशा पद्धतीने पासपोर्टची डिलिव्हरी हवी असेल तर तुम्ही तुमचा पत्ता योग्य असल्याची दक्षता घेणे.

प्रश्न : मी पासपोर्ट पिक-अप केला नाही किंवा पासपोर्ट केंद्र बदलायचे असेल तर? 

उत्तर : तुमच्या मुलाखतीच्या दिवसाच्या आदल्या रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत तुम्ही तुमच्या पासपोर्टच्या डिलिव्हरीचा अथवा पिक-अपचा पत्ता बदलू शकता. तुम्ही १४ कार्यालयीन दिवसांच्या आत जर तुमचा पासपोर्ट पिक-अप केला नाही तर तुमचा पासपोर्ट तुम्ही यू. एस. कौन्सुलेटच्या ज्या कार्यालयात अर्ज केला होता, त्या कार्यालयात परत पाठविला जातो. त्यानंतर मग तुम्हाला वैयक्तिकरित्या येऊन पासपोर्ट स्वीकारावा लागतो, अन्यथा तो बाद समजला जातो. अधिक माहितीसाठी ustraveldocs.com/ येथे संपर्क साधावा.