रहिवासी क्षेत्रात तेलाच्या कारखान्यांना परवानगी मिळतेच कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:05 AM2021-02-07T04:05:52+5:302021-02-07T04:05:52+5:30

मानखुर्द आगीनंतर मुंबईकरांचा सवाल; ‘घर बचाव, घर बनाव’ समिती तयार करणार ग्राउंड रिपोर्ट लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मानखुर्द ...

How do oil factories get permission in residential areas? | रहिवासी क्षेत्रात तेलाच्या कारखान्यांना परवानगी मिळतेच कशी?

रहिवासी क्षेत्रात तेलाच्या कारखान्यांना परवानगी मिळतेच कशी?

googlenewsNext

मानखुर्द आगीनंतर मुंबईकरांचा सवाल; ‘घर बचाव, घर बनाव’ समिती तयार करणार ग्राउंड रिपोर्ट

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मानखुर्द येथे भंगार साहित्याला शुक्रवारी (दि. ५) दुपारी लागलेल्या आगीत सुदैवाने मनुष्यहानी झाली नसली तरी कोट्यवधींचे मोठे नुकसान झाले. येथील आगीस तेल आणि भूमाफिया कारणीभूत असल्याचे समोर येत असल्याने, अशा प्रकारच्या रहिवासी क्षेत्रात मुंबई महापालिका तेलावर प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यांना परवानगी देतेच कशी? असा सवाल मुंबईकरांकडून उपस्थित केला जात आहे. तर, अशा प्रकरणांमध्ये नेमक्या काय अडचणी आहेत, यावर उपाय काय आहेत, यासाठीचा ग्राउंड रिपोर्ट तयार केला जाणार असून, यासाठी ‘घर बचाव, घर बनाव आंदोलन समिती’ काम करणार आहे. या समितीमध्ये विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश असेल.

येथील आग शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता चारीही बाजूंनी घेरण्यात आली. शुक्रवारी दुपारच्या सुमारास लागलेली आग २२ तासांपेक्षा अधिक वेळ धुमसत होती. आगीच्या धुराचे लोट पूर्व उपनगरांतील परिसरात पसरले होते. पूर्वमुक्त मार्गावर याचा परिणाम झाला. येथे वाहतूककोंडी झाली होती. शिवाय जेथे आग लागली तेथील लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. त्यांचे लगतच्या शाळेत स्थलांतर करण्यात आले होते. मात्र, या दुर्घटनेनंतर ‘रहिवासी क्षेत्रात मुंबई महापालिका तेलावर प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यांना परवानगी देतेच कशी?’ असा सवाल ‘घर बचाव, घर बनाव आंदोलना’चे बिलाल खान यांनी उपस्थित केला आहे.

आगीची घटना जेथे घडली तेथे भंगार साहित्य आणि तेलामुळे आग लागल्याचे म्हटले जात आहे. मुळात हा रहिवासी परिसर आहे. अशा ठिकाणी कारखान्यांना परवानगी कशी मिळाली? येथे ज्या तेलावर प्रक्रिया केली जाते, त्या कारखान्यांना परवानगी कोणी? दिली? मुंबई महापालिका याचा छडा का लावत नाही? तपास का करीत नाही. हे अधिकृत आहे की अनधिकृत, याबाबत महापालिका कारवाई का करीत नाही? पहिला प्रश्न हाच आहे की यांना परवानगी दिली? कोणी? याचे उत्तर शोधले पाहिजे. येथे दरवर्षी आग लागते. दरवर्षी अग्निशमन दल येथील आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करते. मात्र ठोस उपाययाेजना केल्या जात नाहीत, अशी खंत खान यांनी व्यक्त केली.

दरम्यान, शुक्रवारी दुपारी लागलेली आग रात्री नऊ वाजता चारीही बाजूंनी घेरण्यात आली. रात्रभर येथील आग विझविण्याचे काम सुरू होते. शनिवारी पहाटे चार वाजता आग पूर्णतः नियंत्रणात आली; तर शनिवारी दुपारी १२ वाजता येथील आग पूर्णपणे विझली, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या नियंत्रण कक्षाने दिली.

* तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश

येथील घटनेची कारणे तपासणे, लोकांशी संवाद साधणे, नेमक्या काय अडचणी आहेत, त्या समजावून घेणे हे काम आता केले जाईल. यासाठी ‘घर बनाव, घर बचाव’ आंदोलनतर्फे एक समिती स्थापन केली जाईल. या समितीत विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश असेल. दरम्यान, अशा प्रकरणांत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेही काम केले पाहिजे. मात्र याकडेही दुर्लक्ष होत असल्याचा नाराजीचा सूर नागरिकांमध्ये आहे.

..............................

Web Title: How do oil factories get permission in residential areas?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.