पवारांना ही वक्तव्ये कशी चालतात?
By Admin | Published: July 23, 2015 01:36 AM2015-07-23T01:36:02+5:302015-07-23T01:36:02+5:30
पुरोगामी विचारांच्या सांगलीत भारतीय जनता पक्षाचा भट निवडून कसा येतो, असले जातीयवादी विचार शरद पवार यांच्या कोणत्या परंपरेत बसतात
मुंबई : पुरोगामी विचारांच्या सांगलीत भारतीय जनता पक्षाचा भट निवडून कसा येतो, असले जातीयवादी विचार शरद पवार यांच्या कोणत्या परंपरेत बसतात, असा सवाल आमदार अनिल गोटे यांनी विधानसभेत केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगली येथे केलेल्या वक्तव्याचा मुद्दा आ. गोटे यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे उपस्थित केला. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर ऊर्फ संभाजी भिडे हेच पश्चिम महाराष्ट्रातील दंगलीचे मुख्य सूत्रधार आहेत, असा आ.जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आरोप पवार यांना चालतो का, असा सवाल करीत सांगलीतील त्या भाषणाची शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणीही केली.
नंतर पत्रकारांशी बोलताना गोटे म्हणाले, की सत्ता नसल्यामुळे राष्ट्रवादी वैफल्यग्रस्त झाली आहे. जातीय तेढ निर्माण करून दंगली घडवून आणण्याचा त्यांचा हेतू आहे. शरद पवारांनी याआधी पुरंदरे यांचा अनेकदा सत्कार केला, त्यांनीच असे विधान करणे चुकीचे आहे. सांगलीच्या सभेत वक्त्यांनी पुरंदरे यांच्यासह लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, सावरकर आदी नेत्यांसह संपूर्ण ब्राह्मण समाजावर अत्यंत प्रक्षोभक टीका केली आहे .