Join us

हातावर पोट असलेल्या किरकोळ विक्रेत्यांनी जगायचे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2021 4:06 AM

छाेट्या व्यावसायिकांचा सवाल; रात्री ८ नंतर असलेल्या जमावबंदीमुळे आर्थिक नुकसानलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ...

छाेट्या व्यावसायिकांचा सवाल; रात्री ८ नंतर असलेल्या जमावबंदीमुळे आर्थिक नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी रात्री ८ नंतर जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या वेळेस बाजारपेठा बंद केल्या जात आहेत. मात्र ज्या बाजारपेठांतील विक्रेत्यांचे व्यवसाय लहान आहेत, ज्यांचे हातावर पोट आहे, सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत ज्यांचा व्यवसाय चांगला होतो, अशा लहान, किरकोळ वस्तू विकणाऱ्या व्यवसायिकांच्या व्यवसायावर गदा आली आहे, अशांनी कसे जगायचे, असा सवाल आता विक्रेत्यांंनी उपस्थित केला आहे.

मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. परिणामी, आता पुन्हा एकदा जमावबंदी लागू केली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात रात्री ८ नंतर बाजारपेठा, दुकाने बंद केली जात आहेत. पोलीस यासाठी जागोजागी पहारा देत आहेत. पोलिसांची व्हॅन गस्त घालत आहे. या जमावबंदीमुळे भाज्यांचे, कडधान्यांचे वाटे विकणारे, फुले-हार विकणारे, कांदे-बटाटे विकणारे यांच्यासह रस्त्यांवर ठिकठिकाणी छोटा ठेला लावून दिवसाला कमाई करणारे आणि याच पैशातून घर चालविणारे छोटे विक्रेते मेताकुटीस आले आहेत. आर्थिक नुकसान हाेत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

सकाळी मुंबईकरांची कार्यालयाकडे जाण्यासाठी धावपळ सुरू असते. शिवाय घरची कामे असतात. त्यामुळे सकाळी ग्राहक बाजारपेठांकडे कमी प्रमाणात फिरकतात. दुपारी उन्हामुळे ते बाजारात येत नाहीत. जेमतेम सायंकाळी आणि रात्री बाजारात गर्दी असते. विशेषत: रात्री ७ ते रात्री १० या वेळेत छोट्या विक्रेत्यांचे पोटापुरते का होईना व्यवहार होत असतात. आणि नेमकी या वेळी जमावबंदी असल्याने आम्ही चरितार्थ चालवायचा कसा, असा सवाल या विक्रेत्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, लालबाग, दादर, माटुंगा, कुर्ला, घाटकोपर, अंधेरी, भांडुप आणि बोरीवलीसह प्रत्येक ठिकाणी असे रस्त्यांवर बसणारे छोटे विक्रेते माेठ्या संख्येने आहेत. छोटे दुकानदार आहेत. सरकारने आमचा विचार करावा, असे म्हणणे त्यांनी मांडले. ग्राहकांना मास्क लावण्यासह कोरोनाचे नियम पाळून रात्री आठनंतरही खरेदी करू द्या, अशी त्यांची मागणी आहे.

* सर्वच झाले निराश

दुकानांमध्ये ग्राहक नाहीत. दुकानाचे भाडे थकले आहे. शेतकरी, शिक्षक, कंपनी मालक, कामगार, दुकानदार सर्वच निराश झाले आहेत. पगार नाही. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न घर कसे चालवायचे? मुलांच्या थकलेल्या फीचा प्रश्न, लाईट बिलाचा प्रश्न, किराणा, औषध या सर्व प्रश्नांचा डोंगर आमच्या समोर उभा आहे.

- विक्रम कांबळे,

अध्यक्ष, नमोनम: बहुद्देशीय संस्था

-------------------------