फास्टॅगला शहरातून विराेध, तर ग्रामीण लोकांकडून कशी अपेक्षा करता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:08 AM2021-03-04T04:08:52+5:302021-03-04T04:08:52+5:30

उच्च न्यायालय; रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला उत्तर देण्याचे निर्देश लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : फास्टॅगला ...

How do you expect Fastag to be opposed by the city, but by the villagers? | फास्टॅगला शहरातून विराेध, तर ग्रामीण लोकांकडून कशी अपेक्षा करता?

फास्टॅगला शहरातून विराेध, तर ग्रामीण लोकांकडून कशी अपेक्षा करता?

Next

उच्च न्यायालय; रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला उत्तर देण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : फास्टॅगला शहरातील लोकांचा विरोध आहे, तर ग्रामीण भागातील नागरिकांनी, शेतकऱ्यांनी याची अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा कशी करता? ग्रामीण भागातील बऱ्याच लोकांचे साधे बँक खातेही नाही, अशी टिपणी करून उच्च न्यायालयाने १० मार्चपर्यंत रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला या याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश उच्च दिले.

फास्टॅगची अंमलबजावणी न करणाऱ्या लोकांकडून टोल रकमेच्या दुप्पट रक्कम दंड म्हणून आकारण्यात येते. मात्र, याबाबत संबंधित कायद्यात कुठेही तरतूद नाही, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. उदय वारुंजीकर यांनी केला, तर फास्टॅगची अंमलबजावणी एका रात्रीत करण्यात आली नाही. त्यासाठी लोकांना पुरेसा कालावधी देण्यात आला, असा युक्तिवाद राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून करण्यात आला.

१५ फेब्रुवारीपासून देशात फास्टॅगद्वारे टोल भरणे बंधनकारक आहे. टोलनाक्यावरील सर्व लेन फास्टॅग लेन केल्या. जे त्याचा वापर करणार नाहीत त्यांना दंड म्हणून टोलच्या दुप्पट रक्कम भरण्यास भाग पाडले जाते. सरकार फास्टॅग वापरण्यास जबरदस्ती करून नागरिकांची एकप्रकारे छळवणूक करीत आहे, अशी जनहित याचिका पुण्याचे रहिवासी अर्जुन खानापुरे यांनी ॲड. विजय दिघे यांच्याद्वारे उच्च न्यायालयात दाखल केली. त्यावरील सुनावणी मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे होती.

अहमदनगर येथे टाेल नाक्यांवरील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पाेलीस संरक्षण मागविण्यात आले, कारण तेथील शेतकऱ्यांचा याला विराेध हाेता. शहरी भागातील लाेकांचा यास विराेध असेल तर गावकरी याची अंमलबजावणी करतील, अशी अपेक्षा कशी करता? असा सवाल न्यायालयाने केला.

* ऑनलाइन फसवणूक होण्याची शक्यता!

याचिकेनुसार, नागरिक टोलची रक्कम रोख भरत असतील, तर त्यांच्याकडून दंड आकारण्याची तरतूद कायद्यात नाही. फास्टॅग सुरू करूनही टोलनाक्यांवर वाहतूककोंडी होणार नाही, याची हमी सरकारने दिली नाही. देशात अशिक्षित, ज्येष्ठांचे प्रमाण बऱ्यापैकी आहे. त्यांना तंत्रज्ञानाची फारशी माहिती नसल्याने सरकारने त्यांना फास्टॅगचा जबरदस्तीने वापर करायला लावू नये. त्यांची ऑनलाइन फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. फास्टॅग नसेल तर प्रवेश नाही, असे बॅनर टोलनाक्यांवर आहेत. नागिरकांना देशभर प्रवासाचा घटनादत्त अधिकार आहे. त्यावर सरकार निर्बंध आणू शकत नाही. सर्व टोलनाक्यांवर एक लेन रोख रकमेसाठी खुली ठेवावी. फास्टॅग बंधनकारक करण्यासंदर्भात सरकारने १२ व १४ फेब्रुवारी काढलेली परिपत्रके रद्द करावीत, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

----------------------

Web Title: How do you expect Fastag to be opposed by the city, but by the villagers?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.