मुंबई - माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस ह्या सोशल मीडियावर बऱ्यापैकी अॅक्टिव्ह असतात. त्यांचं गायन, स्टाईल स्टेटमेंट आणि बेधडक प्रतिक्रिया देणं, यामुळे त्यांना अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. अशा प्रकारे ट्रोलिंग झाल्यावर काय वाटतं याचा उलगडा आता खुद्द अमृता फडणवीस यांनी केला आहे.
एबीपी माझाने आयोजित केलेल्या महामाझा कट्टा कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस हेही सहभागी झाले होते. त्यावेळी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेल्या अमृता फडणवीस यांना ट्रोलिंगबाबत विचारण्यात आले तेव्हा त्यांनी ट्रोलर्सबाबत बेघडक मत मांडले. तसेच ट्रोलर्स मामी म्हणून ट्रोल करतात, त्याबाबत काय वाटते, असे विचारले असता अमृता फडणवीस यांनी मल्ला मज्जाच वाटते असे सांगितले.
यावेळी आपलं ट्रोलिंग करणाऱ्या ट्रोलर्सचे आभार मानत अमृता फडणवीस यांनी त्यांना खोचक टोला लगावला. त्या म्हणाल्या, मी त्रिशंकू सरकारच्या ट्रोलर्सना नक्कीच धन्यवाद देईन कारण त्यांच्यामुळेच माझ्यातील स्त्रीशक्तीचा जागर झाला आहे. मी असेत माझे विचार व्यक्त करत राहीन, तुम्ही मला असेच ट्रोल करत राहा, अशीही मी तुम्हाला विनंती करते, असा टोला त्यांनी लगावला.
तसेच मी आतापर्यंत जे काही ट्विट डिलीट केले आहेत, ते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याने डिलीट केले आहेत. नाहीतर मी कुणाच्या बापाला घाबरत नाही, असेही अमृता फडणवीस यांनी सांगितले.