Join us

फिटनेस नसलेली बस कशी ओळखाल? 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2023 12:53 PM

फिटनेस झालेली बस वा खासगी वाहन ओळखाचे कसे, असा प्रश्न प्रवाशांना पडतो.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई, प्रवाशांचा सुखकर प्रवास व्हावा, त्यांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, यासाठी वाहनाचे फिटनेस करण्याची सूचना परिवहन विभागाकडून नेहमीच केली जाते. मात्र, याकडे  दुर्लक्ष केले जाते. विना फिटनेस झालेली  सार्वजनिक  बस असो किंवा खासगी वाहन त्याचा अपघात झाल्यास विम्याचा लाभही मिळू शकत नाही. प्रवाशांनी फिटनेस झालेल्या बसमधूनच प्रवास करावा. परंतु, फिटनेस झालेली बस वा खासगी वाहन ओळखाचे कसे, असा प्रश्न प्रवाशांना पडतो.

एसटी बसचाही आहे समावेश

प्रवासी वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक करण्यात आले आहे. यात राज्य परिवहन महामंडळाच्या बसचाही समावेश आहे. या संदर्भात प्रादेशिक परिवहन विभागाने बैठक घेत सूचनाही दिल्या आहेत. त्यानुसार बहुतांश बसगाड्यांचे  फिटनेस झाले.  एसटी महामंडळाकडून नेहमीच बसगाड्यांच्या फिटनेसकडे लक्ष दिले जाते. त्यातच आता आगाराच्या ताफ्यामध्ये नव्या बसगाड्या आल्या आहेत. त्यामुळे महामंडळाच्या गाड्यांकडे फिटनेस आहे.

एम परिवहनवर तपासा फिटनेस 

परिवहन विभागाच्या ॲपवर अनफिट बस कोणत्या आहेत, याबाबतची माहिती टाकली जाणार आहे. सध्या हे ॲप विविध माहिती संकलित करण्याचे काम करीत आहे. गाडीचा अपघात झाल्यानंतर गाडीचे होणारे नुकसान भरून निघत नाही, याशिवाय अपघातग्रस्तांनाही कुठलीही मदत मिळताना अडचणी येतात.

अशी मिळेल माहिती

गाडीमध्ये प्रवाशाला नजरेस पडेल अशा दर्शनी भागात स्टिकर लावण्यात यावे, अशा  सूचना आहे. त्यामुळे प्रवाशाला गाडीचे फिटनेस झाले की नाही याबाबत माहिती मिळेल.

दुर्लक्ष करणाऱ्या बसवर कारवाई 

फिटनेसशिवाय धावणाऱ्या खासगी स्कूल बसची संख्या मोठी आहे. स्कूलबसला फिटनेस करण्याच्या सूचना अनेकदा देण्यात आल्या. मात्र, याकडे ते दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. अशांवर आरटीओकडून कारवाई केली जाते.

 

टॅग्स :राज्य सरकार