- नामदेव मोरेलोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई: शेतकरी शेतात पिकवलेली भेंडी मुंबईत आणतो. व्यापाऱ्यांना ती भेंडी तो २० ते ३६ रुपये किलो या दरम्यान विकतो. मात्र, तीच भेंडी आपल्या घरात येताना १०० रुपये किलो होते. मधल्यामध्ये दलालांनी ७० ते ७५ रुपये किलोमागे मारलेले असतात. काबाडकष्टाने भाज्या पिकविणाऱ्या शेतकऱ्याच्या हातात कवडीमोल भाव पडत असतो. दलालांची साखळी याला कारणीभूत असते. प्रत्येक भाजीच्या बाबतीत हेच होत आहे. शेतकरी कष्ट करून भाजीपाला पिकवतो. गाडीघोडे करुन मुंबईला आणतो. मात्र जेव्हा त्याच्या हातात पैसे पडतात तेव्हा केलेल्या कष्टाची दलालांनी कशी माती केली हे त्याच्या लक्षात येते.
हतबलपणे मिळालेले पैसे घेवून जाण्याशिवाय त्याच्या हातात काहीही उरत नाही. मुंबईकर देखील हीच भाजी एसी मॉलमध्ये जावून चढ्या दराने विकत घेतात तेव्हा आपला खिसा कसा कापला गेला हे त्यांनाही कळत नाही. पावसाळा सुरू झाल्यापासून भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. मुंबईमधील किरकोळ मार्केटमध्ये टोमॅटो १०० ते १२० रुपये किलो दराने विकला जात आहे. बाजार समितीत मात्र टोमॅटोला ३५ ते ६० रुपये दर आहे. यामधूनही वाहतूक, तोलाई, हमालीचा खर्च वजा केल्यानंतर शेतकऱ्यांच्या हातामध्ये अत्यंत कमी पैसे मिळत आहेत.शेतकरी भाजीपाल्यांची लागवड करतो. २ ते ३ महिने दिवसरात्र मेहनत करून पीक तयार करतो. यानंतर बाजार समितीपर्यंत वाहतूक करून त्याला जो भाव मिळतो, त्याच्या दुप्पट भावाने ग्राहकांना प्रतीकिलोला बाजार समिती व किरकोळ बाजारातील भाजीचे दर व शेतकऱ्याच्या हातात येणारी रक्कम ही तुटपुंजी असते.
शेतकरी ते बाजार समिती व तेथून किरकोळ मार्केटपर्यंत कृषी माल जाताना वाहतूक व इतर खर्च मोठ्या प्रमाणात येतो. मध्यस्थांची साखळी कमी करण्यासाठी शहरातील नागरिकांनी खरेदी गट करून थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करणे योग्य होईल. शेतकऱ्यांना थेट विक्री करण्यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा असणे आवश्यक आहे.- अनिल घनवट, अध्यक्ष, स्वतंत्र भारत पक्ष
किरकोळमध्ये भाव जास्त का?बाजार समितीमध्ये खरेदी केलेल्या मालामधील काही माल खराब असतो. वाहतूक, मार्केटमधील जागा भाडे व इतर खर्चही येतात. सायंकाळपर्यंत विक्री झाली नाही तर माल कमी किमतीत विकावा लागतो. खराब झाला तर फेकून द्यावा लागतो. यामुळे होलसेलपेक्षा किरकोळमध्ये दर जास्त असतात.- किरकोळ व्यापारी