अवघ्या २ लाख शिवभाेजन थाळीत संपूर्ण महाराष्ट्रातील गरिबांचे पाेट कसे भरणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:07 AM2021-04-30T04:07:43+5:302021-04-30T04:07:43+5:30
‘घर बनाओ घर बचाओ आंदोलन’ कार्यकर्त्यांचा सवाल लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : लॉकडाऊन लावायचे की नाही, दुकानांना परवानगी द्यायची ...
‘घर बनाओ घर बचाओ आंदोलन’ कार्यकर्त्यांचा सवाल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लॉकडाऊन लावायचे की नाही, दुकानांना परवानगी द्यायची की नाही, बाजारपेठा सुरू ठेवायच्या की नाहीत, अशा अनेक प्रश्नांबाबत व्यापाऱ्यांसाेबत चर्चा करायला सरकारला वेळ आहे. मात्र जी गरीब जनता लॉकडाऊनमध्ये पिचत आहे, त्यांच्या प्रतिनिधींसोबत बोलायला सरकारला वेळ नाही, अशी खंत ‘घर बनाओ घर बचाओ आंदोलन’च्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. सरकारने राज्यातील गरजूंसाठी २ लाख शिवभोजन थाळींची महिनाभरासाठी व्यवस्था केली. परंतु संपूर्ण महाराष्ट्रातील गरीब जनतेला त्या कशा पुरणार, असा सवालही या आंदाेलनचे कार्यकर्ते बिलाल खान यांनी केला.
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले. परंतु या कठोर निर्बंध आणि नियमावलीमुळे गरिबांच्या पोटाला चिमटा बसत आहे. कामगार स्थलांतरित होत असले तरी बहुतांश मजूर हे मुंबईत आहेत. काम बंद असल्यामुळे रोजगार नाही. त्यामुळे खायचे काय, असा प्रश्न मजुरांना पडला आहे. सरकारने आर्थिक दुर्बल घटकांना दिलासा देण्यासाठी पॅकेज जाहीर केले. राज्यातील गरजूंसाठी २ लाख शिवभोजन थाळींची महिनाभरासाठी व्यवस्था केली. परंतु हे किती पुरेसे आहे, असा प्रश्न खान यांनी उपस्थित केला.
मुंबईमधील ४२ टक्के लोकसंख्या झोपडपट्टी, वसाहतीत राहते. मानखुर्दमध्ये ९० टक्के, धारावीमध्ये १० लाख, मालवणीत ९० टक्के, बेहरामपाड्यात १०० टक्के नागरिक झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे आहेत. शासनाने २ लाख शिवभोजन थाळींची जी व्यवस्था केली आहे ती सर्व गरिबांची पोट भरण्यासाठी पुरेशी नाही. एवढ्या कमी थाळींमध्ये काही मदत होणार नाही. भोजनाच्या २ लाख थाळी मानखुर्दमधल्या गरिबांनाच पुरणार नाहीत, तर संपूर्ण महाराष्ट्रातील गरिबांचे पोट कसे भरणार? गरीब आणि गरजूंसाठी केलेली तरतूद फार कमी आहे. ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही, त्यांचे पोट कसे भरणार, असा सवालही राज्यातील गरिबांच्या वतीने या ‘घर बनाओ घर बचाओ आंदोलन’ने उपस्थित केला.
..................................