Join us

...असे उभे राहिले देशातील पहिले मोठे कोविड सेंटर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 4:06 AM

कोरोनाविरुद्धचा लढा अजूनही सुरूचसचिन लुंगसेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बीकेसी येथे एमएमआरडीएने १५ दिवसांत २०० आयसीयू बेड्स ...

कोरोनाविरुद्धचा लढा अजूनही सुरूच

सचिन लुंगसे

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : बीकेसी येथे एमएमआरडीएने १५ दिवसांत २०० आयसीयू बेड्स आणि १००० बेड्सची जम्बो सुविधा असलेले देशातील पहिले ओपन हॉस्पिटल उभारले. महालक्ष्मी येथेही कोरोना केअर सेंटरचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. ६०० बेड्सची सुविधा, १२५ बेड्सचे आयसीयू वॉर्ड असे नियोजन करण्यात आले. तर गोरेगाव येथे ५३५ बेड्सची सुविधा असलेले जम्बो सुविधा कोरोना सेंटर रुग्णांसाठी सज्ज ठेवण्यात आले. तेव्हापासून कोरोनाविरुद्ध सुरू असलेला लढा आजही सुरूच आहे.

कोरोनाचा संसर्ग अत्यंत वेगाने होत असतानाच त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कर्तव्यनिष्ठ भावनेने आणि कुशल पद्धतीने केवळ १५ दिवसांत वांद्रे-कुर्ला संकुलात उभारलेल्या कोविड सेंटरमध्ये लसीकरणाच्या मोहिमेचा शुभारंभ झाला, याचा अभिमान असून या ऐतिहासिक क्षणाची नोंद येथे झाल्याचा अत्यानंद होत आहे, अशी प्रतिक्रिया मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) दिली. कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी एमएमआरडीएने वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथील मैदानावर अगदी सुरुवातीला सर्वात मोठे कोविड सेंटर स्थापन केले होते. कोरोनाच्या उपाययोजनांसाठी आरोग्य सुविधांची उभारणी करताना मुंबईत मोकळ्या मैदानांवरील क्षेत्रीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे (आयसीयू) बेडस् उपलब्ध करून देण्याची किमया यंत्रणांनी केली होती. यात बीकेसी येथील कोविड सेंटरचा समावेश आहे. जुलै २०२० मध्ये येथे दुसरा टप्पा उभारण्यात आला. तत्पूर्वी साधारणत: एक महिन्याभरापूर्वी बीकेसी येथील मैदानावर १००० खाटांचे रुग्णालय उभारण्यात आले. त्याच ठिकाणी दुसऱ्या टप्प्यात अतिरिक्त १२०० खाटांचे आयसीयु, डायलेसिसची सुविधा असलेले रुग्णालय उभारण्यात आले.

रेसकोर्स, दहिसर, गोरेगाव, मुलुंड येथे ७००० पेक्षा जास्त बेड्सची सुविधा असलेले डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल सेंटर आणि डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलचे नियोजन करण्यात आले. धारावी येथील महाराष्ट्र निसर्ग उद्यानाजवळ ऑक्सिजन सुविधायुक्त २०० खाटांचे कोरोना रुग्णालय उभारण्यात आले. भायखळा येथील रिचर्डसन क्रुडास कंपनीच्या आवारातील सेंटरमध्ये एक हजार रुग्णांच्या उपचारांची सोय करण्यात आली. मुलुंड, दहिसर, महालक्ष्मी रेसकोर्स येथे आणि बीकेसी मिळाून ३ हजार ५२० बेड्सच्या जम्बो सुविधा देण्यात आल्या.

मुंबई महापालिकेने जम्‍बो कोविड केंद्रे सुरू केली. यात ७,६५० बेड, १,४६६ वैद्यकीय कर्मचारी आणि ३५ तज्‍ज्ञ कोरोनाविरुद्ध लढत होते. यामध्‍ये भायखळा, एनएससीआय वरळी, बीकेसी, नेस्‍को गोरेगाव, मुलुंड आणि दहिसरचा समावेश होता. गोरेगाव येथील नेस्को सेंटर परिसरात २२४ खाटांचे सुसज्ज असे आयसीयू, एचडीयू कोविड रुग्णालय उभारण्यात आले. महापालिकेच्या वतीने गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये कोविड रुग्णांसाठी अत्याधुनिक आयसीयू, एचडीयू, डायलिसीस रुग्णालय सुरू करण्यात आले. या कोविड सेंटरमध्ये लिक्विड मेडिकल ऑक्सिजन, विविध प्रकारचे व्हेंटिलेटर, प्रत्येक बेडसोबत मल्टिपॅरा मॉनिटरची सुविधा देण्यात आली. सर्व बेड्स सेंट्रल सर्व्हिलन्स सिस्टीमला जोडण्यात आले.

* बीकेसीतील कोविड रुग्णालय

- रुग्णालयावर ५३ कोटींचा खर्च

- प्रत्येक बेडमागे २ लाख ५० हजार रुपये खर्च

- २ हजार ११८ बेड

- पहिल्या टप्प्यात सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल यावर १४ कोटी २१ लाख ५३ हजार ८२५ रुपये खर्च

- दुसऱ्या टप्प्यात २१ कोटी ५५ लाख २५ हजार ३५३ रुपये खर्च

- दोन्ही टप्प्यात बेडची संख्या १ हजार ५९ अशी एकूण २ हजार ११८

- पहिल्या टप्प्यात साहित्य आणि उपकरणे यावर ५ कोटी २६ लाख ४७ हजार ४०६ रुपये खर्च

- दुसऱ्या टप्प्यात १२ कोटी ६ लाख ३३ हजार २५९ रुपये खर्च

--------------------