स्पर्धाच नाही तर क्रीडा गुण देणार कसे ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:07 AM2021-03-25T04:07:21+5:302021-03-25T04:07:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई दहावी बारावीच्या परीक्षा अवघ्या महिन्यावर आल्या असून कला क्रीडा गुणांचे कोडे अजूनही विद्यार्थी पालकांना सुटलेले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई
दहावी बारावीच्या परीक्षा अवघ्या महिन्यावर आल्या असून कला क्रीडा गुणांचे कोडे अजूनही विद्यार्थी पालकांना सुटलेले नाही. बोर्डाच्या परीक्षेत मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेला शारीरिक गुणवत्तेमुळे हातभार लागत असतो. क्रीडा गुणामुळे विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेत वाढीव गुण मिळत असतात. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्षभर शाळा बंदच होत्या. त्यामुळे साहजिकच कोणत्याही प्रकारच्या मैदानी खेळांचे आयोजन, नियोजनच करण्यात आलेले नाही. मात्र यामुळे आता बोर्डाच्या परीक्षेत शाळा स्तरावर , तालुका स्तरावर , जिल्हा पातळीवरील खेळणाऱ्या आणि बोर्डाच्या परीक्षेत प्रस्ताव देणाऱ्या दहावी बारावीच्या क्रीडा खेळाडू विद्यार्थ्यांना हे गुण मिळणार की नाही यामुळे पालक विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
बोर्डाच्या परीक्षेत क्रीडा स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना १० गुण , राज्य स्तरावर खेळणाऱ्या विद्यार्थ्यांना १५ आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या विद्यार्थ्यांना २५ गुण वाढीव दिले जातात. यंदा शाळास्तरावर दूरच मात्र शासन स्तरावर ही कोणत्याच खेळ अथवा स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले नाही. संपूर्ण शैक्षणिक वर्ष ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्याने खेळाडू विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांवर खेळाचे गुण दिसणार की नाही यात शंकाच आहे. स्पर्धाच झाल्या नसल्याने शासनाकडे प्रस्ताव कसे पाठवायचे ? यासंदर्भात शिक्षण विभागाकडूनही काहीच निर्देश नसल्याने शाळा व मुख्याध्यापकही याबाबतीत अनुत्तरित असल्याच्या प्रतिक्रिया देत आहेत.
वर्षभर ऑनलाईन शिक्षणामुळे क्रीडा स्पर्धांचे आयोजन करता आले नाही. यामध्ये विद्यार्थ्यांचा काहीच दोष नाही याचा बोर्डाने विचार करावा. अनेक विद्यार्थ्यांना क्रीडा गुणांचा शैक्षणिक गुणवत्तेला आधार असतो. त्यामुळे यासंदर्भातील निर्णय घेऊन मुख्याध्यापक शाळांना त्याबाबत लवकर अवगत करावे अशी मागणी शिक्षक, पालक करत आहेत.
.....
शैक्षणिक वर्ष २०२०- २१- एकूण क्रीडा प्रस्ताव मुंबई विभाग - दहावी -० : बारावी - ०
....... .....
क्रीडा गुणांच्या प्रस्तावावर अजून काहीही निर्णय शिक्षण विभागाकडून न आल्याने सगळेच मुख्याध्यापक संभ्रमात आहेत. विद्यार्थी, पालकांना नेमकी काय उत्तरे द्यायची हा प्रश्न आम्हाला पडला आहे. यासंदर्भात निर्णयासाठी आम्ही लवकरच विभागीय बोर्डात जाणार आहोत. यासोबतच शाळा आणि संस्थांच्या परीक्षांबाबतच्या इतर अनेक समस्यांकडेही शिक्षण विभागाने लक्ष द्यावे ही अपेक्षा आहे.
प्रशांत रेडीज , सचिव, मुख्याध्यापक संघटना , मुंबई
शिक्षण विभागाने खेळाडू विद्यार्थी व क्रीडा गुणांच्या बाबतीत आतापर्यंत निर्णय घेणे अपेक्षित होते. याकडे दुर्लक्ष करून खेळाडू विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशांसाठी अडचण येऊ शकते. क्रीडा गुण आणि त्यांचा उल्लेख यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे पुढील क्रीडा क्षेत्रातील प्रवेश सोप्या पद्धतीने करता येतात. अद्याप वेळ गेलेली नसल्याने विभागाने यासंदर्भातील निर्णय लवकर जाहीर करावा.
अभय परांजपे , क्रीडा शिक्षक
.........
विद्यार्थी प्रतिक्रिया
यंदा स्पर्धा झालेल्या नाहीत हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे आम्ही प्रस्ताव पाठवूच शकत नाही हे शाळांचे म्हणणे आहे. आमच्या पाठीमागच्या परफॉर्मन्सवर तरी आम्हाला क्रीडा गुण द्यावेत अशी आमची मागणी आहे. मात्र आता याबाबतीत बोर्डाचा निर्णय काय येईल याकडे आमचे लक्ष आहे
सुभाष केंद्रे, विद्यार्थी ,दहावी
कोरोनामुळे आधीच आमच्या शिक्षणावर गदा आली आहे आणि नंतर ती मैदानी खेळांवरही, मात्र शिक्षण ऑनलाईन करताना आपले खेळ नाही. मैदानी स्पर्धा, खेळ आयोजित न झाल्याने कशाच्या आधारावर क्रीडा गुण दिले जाणार हा प्रश्न शाळांना पडला आहे. हा गुंता बोर्डाने सोडविणे आवश्यक आहे.
मंजिरी सोनावणे , विद्यार्थिनी ,दहावी
काही विद्यार्थ्यांना अभ्यासात रुची असते तर काहींना खेळात आणि मग त्या दृष्टीने त्या क्षेत्रात करिअर करतात. मात्र यंदा क्रीडा स्पर्धा न झाल्याने खेळाचे गुण खेळाडूंना मिळणार नाहीत. यामुळे साहजिकच त्यांना रुची असलेल्या क्रीडा प्रकाराचा त्यांना पुढील प्रवेशासाठी उपयोग होणार नाही. विद्यार्थ्यांची रुची जपण्यासाठी बोर्डाने योग्य तो निर्णय लवकर घ्यावा.
अभिजित पिलावलकर , विद्यार्थी , बारावी
शैक्षणिक गुणवत्तेला जोड म्हणून क्रीडा गुणांचा सहभाग असतो. महत्त्वाच्या परीक्षेत या गुणवत्तेची मदत होणार नसेल तर काय उपयोग ? सवलतीचे क्रीडा गुण विद्यार्थ्यांसाठी आधार असतात. बोर्डाने व शिक्षण विभागाने यासंदर्भातील निर्णय घेऊन प्रस्ताव मागवावेत हीच अपेक्षा आहे.
रिया खंदारे, बारावी , विद्यार्थिनी