- मनोहर कुंभेजकरलोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सन २०२२मध्ये होऊ घातलेल्या पालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आतापासूनच सज्ज झाली आहे. त्यादृष्टीने नुकतेच पक्षाच्या मुंबई कार्यकारिणीचे खातेवाटप जाहीर झाले. मुंबईत काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी ‘माझी मुंबई - माझी काँग्रेस’ हा दिशादर्शक कार्यक्रम आखून दिलेला आहे. राज्याचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या खातेवाटप बैठकीस सुशीलकुमार शिंदे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण हे उपस्थित होते. सध्या पालिकेत काँग्रेसचे ३१ नगरसेवक असून, आगामी निवडणुकीत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याची जबाबदारी विद्यमान अध्यक्ष भाई जगताप आणि त्यांच्या टीमवर आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप आणि कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांना विविध जबाबदाऱ्या विभागून देण्यात आलेल्या आहेत. पुढील १०० दिवसांचा कार्यक्रम कार्यकर्त्यांना द्यायचा आहे. तसेच, मुंबईच्या २२७ प्रभागांत पदयात्रा काढण्यात येणार आहेत. त्याचेही नियोजन करायचे आहे.
अशी आहे जबाबदारीकार्यकारी अध्यक्ष चरणसिंग सप्रा यांना येत्या २६ जानेवारीपर्यंत सोशल मीडिया सेलची पुनर्रचना, बूथ, जिल्हा, तालुक्याचे फेसबुक पेज तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. माजी मंत्री नसीम खान यांना प्रचार समितीची जबाबदारी दिलेली आहे. त्यांनी नियुक्त केलेल्या समिती आणि उपसमितीने २२७ वॉर्डमध्ये निवडणुकीपूर्वी दोन ते तीन वेळा भेट द्यायची आहे.माजी आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांना जाहीरनामा समितीची जबाबदारी सोपविली आहे. काँग्रेस सरकारच्या काळात केलेली कामे, भाजपचे अपयश, मनपात काँग्रेसने पूर्वी केलेली कामे या सर्व बाबींचा योग्य अभ्यास करून त्यांनी अहवाल अखिल भारतीय काँग्रेसला पाठवायचा आहे. डॉ. अमरजीत मनहास यांच्यावर निवडणूक व्यूहरचना करण्याची जबाबदारी सोपविलेली आहे. तसेच, मुंबई काँग्रेसला गतवैभव मिळवून देण्यासाठी कृती आराखडा तयार करायचा असून, तो राबविण्यासाठी १४ जानेवारीपर्यंत कमिटीची स्थापना करायची आहे.