मुंबईः कर्तव्यनिष्ठ आणि डॅशिंग पोलीस अधिकारी म्हणून सुपरिचित असलेले राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक हिमांशू रॉय यांनी आज नैराश्यातून आत्महत्या केली आहे. गेल्या काही वर्षांपासून ते कॅन्सरशी झुंज देत होते. या कर्करोगाचं निदान खूपच अनपेक्षितपणे झालं होतं आणि तो हिमांशू रॉय यांच्यासह संपूर्ण पोलीस खात्यासाठी धक्काच होता.
हनुमानाचे निस्सीम भक्त असलेल्या हिमांशू रॉय यांचं व्यायामावरचं, फिटनेसवरचं प्रेम सर्वश्रुतच आहे. त्यासोबतच, हॉर्स रायडिंग हाही त्यांचा छंद होता. दोन वर्षांपूर्वी घोडेस्वारी करताना ते पडले होते आणि त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. बरेच दिवस ती बरी होत नसल्यानं डॉक्टरांनी काही चाचण्या करण्याचा सल्ला दिला होता. त्याचे रिपोर्ट आल्यावर नव्याने औषधोपचारही सुरू करण्यात आले होते. पण, तरीही दुखणं सुरूच होतं. तेव्हा, डॉक्टरांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली असावी. त्यांनी रॉय यांना कॅन्सरची चाचणी करायला सांगितली आणि त्यातून कटू सत्य समोर आलं होतं. हिमांशू रॉय यांना बोनमॅरोचा कॅन्सर असल्याचं निदान झालं. अर्थात, लढवय्या आयपीएस अधिकारी डगमगला नाही. मुंबईत, पुण्यात आणि परदेशात जाऊन त्यांनी त्यावर उपचार करून घेतले. तब्येतीत लक्षणीय सुधारणाही झाली. पण, हा आनंद फार काळ टिकला नाही. कॅन्सर हाडांमध्ये पसरत गेला आणि हिमांशू रॉय शरीरासोबतच मनानेही खचत गेले. या नैराश्याच्या भरातच त्यांनी आज स्वतःवर गोळी झाडून घेतली.
आज दुपारी कुलाबा येथील निवासस्थानी हिमांशू रॉय यांनी आत्महत्या केली. हे वृत्त वेगानं पसरलं आणि सगळ्यांनाच धक्का बसला. त्यांच्या जाण्याने एक कर्तव्यनिष्ठ, जिगरबाज आणि धडाडीचा पोलीस अधिकारी गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.