Join us

Uddhav Thackeray: 'मी मुख्यमंत्री कसा बनलो', उद्धव ठाकरेंनी सांगितलं बंद खोलीत काय घडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 6:26 PM

विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर काही आमदार सूरतला गेले, आता ते गुवाहटीला गेल्याचं सांगितलं जात आहे.

मुंबई - शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षात दोन गट निर्माण झाले आहेत. एकनाथ शिंदे आपल्यासोबत 35-40 आमदार घेऊन गेले असून, राज्यातील सरकार अल्पमतात जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी आज फेसबूकद्वारे जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी बंडखोरी केलेल्या आमदारांना उद्देशून भाष्य केले. तसेच, मी मुख्यमंत्री कसा झालो ही घटनाही कथन केली. महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर काय झालं हेही त्यांनी सर्वांना जाहीरपणे सांगितलं. 

विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर काही आमदार सूरतला गेले, आता ते गुवाहटीला गेल्याचं सांगितलं जात आहे. तसेच, मी इच्छेपेक्षा जिद्दीने मी करणारा माणूस आहे. मला कशाचाही अनुभव नसताना मी मैदानात उतरलो. आपल्याला नाईलाज झाला, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जावं लागलं. गेल्या 25-30 वर्षे ते आपल्याविरोधात होते, आपण त्यांच्याविरोधात लढत आलो. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने, विशेषत: शरद पवार यांनी आमच्या बैठकीनंतर मला बोलवलं. मला म्हणाले, उद्धव मला जरा तुला काही बोलायचंय, त्यावेळी बाजूला खोलीत घेऊन त्यांनी सांगितलं. 

उद्धव, जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल, आमच्याकडे ज्येष्ठ लोकं आहेत, तुमच्याकडेही ज्येष्ठ लोकं आहेत. शिवसेनेकडून तुम्ही नसाल तर पुढे चालणं कठीण आहे. त्यावेळी, मी नकार देत मला कसलाही अनुभव नसल्याचं सांगितलं. तसेच, मी महापालिकेतही महापौर जिंकल्यानंतर केवळ अभिनंदन करायला जातो. मग, मी मुख्यमंत्री कसा होणार असा सवाल त्यांना केला होता. पण, त्यांनी मला आग्रह केल्यामुळे मी जिद्द केली. शरद पवार आणि सोनिया गांधींनी माझ्यावर विश्वास टाकला. सोनिया गांधींही मधेमधे फोन करत असतात, असा बंद खोलीत घडलेला प्रसंग उद्धव ठाकरेंनी आज जाहीरपणे सांगितला. 

'मी शस्त्रक्रियेमुळे भेटत नव्हतो'

"मुख्यमंत्री का भेटत नव्हते, त्याचे कारण म्हणजे माझी शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतरचे दोन तीन महिने फार विचित्र होते, त्यामुळेच मी भेटत नव्हतो. मी भेटत नव्हतो, हा मुद्द बरोबर आहे. आता मी भेटायला सुरुवात केली आहे. बर, भेटत नव्हतो म्हणजे काम होतं नव्हते असे नाही. मी पहिली कॅबिनेट मिटींग रुग्णालयातून केली होती. शिवसेना आणि हिंदुत्व जोडलेले शब्द आहेत. शिवसेना आणि हिंदुत्व कधीची वेगळे होऊ शकत नाहीत. सेनेने हाच नारा दिला आहे. विधान भवनात हिंदुत्वावर बोलणारा मी एकमेव मुख्यमंत्री आहे."

मी मुख्यमंत्रीपद सोडायला तयार...!

माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्रिपदी नको असेन तर मी काय करायचं. इथे येऊन बोलायला काय हरकत होती. उद्धवजी, तुम्ही कारभार करायला नालायक आहात. आम्हाला तुम्ही मुख्यमंत्रिपदी नको. एकाही आमदाराने असं स्टेटमेंट दिलं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर नकोत, तर मी आत्ता राजीनामा द्यायला तयार आहे. मी मुक्काम वर्षावरून मातोश्रीवरुन हलवत आहे.. कोणताही मोह मला अडवू शकत नाही, असे उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितले. मी मुख्यमंत्रीपद आणि शिवसेना पक्षप्रमुख हे दोन्हीही पदं सोडायला तयार आहे. मी मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे, पण माझ्याजागी शिवसेनेचाच मुख्यमंत्री बसायला हवा. त्यासाठी, माझ्यासमोर नसलेल्या आमदारांनी माझ्याकडे येऊन मला सांगावं, तुम्ही मुख्यमंत्रीपदी नको आहात. मी त्याचक्षणी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतो.   

टॅग्स :शरद पवारमुख्यमंत्रीउद्धव ठाकरेशिवसेना