लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रभाव थेट विधिमंडळाच्या कार्यशैलीवरही झाल्याचा प्रत्यय सोमवारी आला. शुक्रवारी विधान परिषदेतील राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी एकनाथ खडसे यांची निवड करण्यात आली होती. मात्र विधिमंडळाने यासंदर्भात काढलेल्या पत्रकात एकनाथ शिंदे, अशी नोंद झाल्याने दोन्ही सभागृहांत एकच खळबळ उडाली. शिंदे यांनी शिवसेना पळवली आहे, आता आमच्याही पक्षाचे गटनेतेपद त्यांनी बळकावले की काय, असा सवाल राष्ट्रवादीचे सदस्य जयंत पाटील यांनी विधानसभेत केला तर शशिकांत शिंदे यांनी याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी विधान परिषदेत केली.
विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानपरिषदेचे गटनेते म्हणून एकनाथ खडसे आणि पक्षप्रतोद अनिकेत तटकरे यांची नियुक्ती करण्याबाबत राष्ट्रवादीने पत्र दिले होते. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी तशी घोषणाही मागच्या आठवड्यात केली. याबाबतचे परिपत्रक काढताना मात्र विधिमंडळ सचिवालयाने चूक करत एकनाथ खडसे यांच्याऐवजी एकनाथ शिंदे यांची राष्ट्रवादीचे गटनेते म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे नोटिफिकेशन काढले.
जयंत पाटील यांची टोलेबाजी
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज ही चूक सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देशाचे पंतप्रधानच बदलले आहेत. त्यांनी शिवसेनाही स्वतःकडे घेतली आहे. आता माझ्याकडे असलेले पक्षाचे गटनेता पदही धोक्यात आले आहे, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला. नागालँडमध्ये रीओ यांनी सर्व पक्षाचा पाठिंबा घेतला. आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही नवी पद्धत राज्यात सुरू केली आहे का? असा मिश्किल टोला जयंत पाटील यांनी लगावला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"