Join us

धारावीत दाटीवाटीच्या परिसरात सिलिंडरच्या वाहनांचे पार्किंग कसे? वाहतूक पोलिसांचा सर्रास कानाडोळा

By सचिन लुंगसे | Updated: March 26, 2025 14:34 IST

भरदिवसा रस्त्यांच्या कडेला लोडिंग-अनलोडिंगचे काम

सचिन लुंगसे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: धारावी येथील ट्रकमधील गॅस सिलिंडर स्फोटाच्या दुर्घटनेनंतर मुंबईतील रस्त्यांवर बेकायदा पार्किंग केल्या जाणाऱ्या वाहनांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सिलिंडरनी भरलेली वाहने रिकामी करण्याचे कामही बिनदिक्कतपणे सुरू असते. वाहतूक पोलिसांचे कायमच, याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे पुन्हा अशा दुर्घटना घडल्या तर जबाबदार कोण, असा सवाल जागरूक नागरिकांनी केला आहे.

धारावीतील रहिवासी जालिंदर रामगुडे यांनी सांगितले की, सोमवारी सिलिंडरच्या स्फोटांचे आवाज एक किलोमीटर अंतरावर ऐकायला येत होते. काळा किल्ला ते पीएमजीपी कॉलनीपर्यंतच्या परिसरात घबराट निर्माण झाली होती. आगीच्या ज्वाला आणि स्फोटांनी काही क्षण धारावी हादरून गेली होती. नक्की काय होत आहे, हेच रहिवाशांना समजत नव्हते. अनेक जण घाबरून सैरावैरा पळत होते. तर, अनेकांनी स्फोटांच्या आवाजाच्या दिशेने बचाव कार्यासाठी धाव घेतली. 

रस्ता वाहतुकीस खुला अन् बघ्यांची गर्दी

धारावी निसर्ग उद्यानासमोरील रस्ता रात्रीपासूनच बंद करण्यात आला होता. मंगळवारी सकाळी रस्त्याची एक बाजू वाहतुकीसाठी खुली करण्यात आली होती. दुपारपर्यंत घटनास्थळी अग्निशमन दलाचे कुलिंग ऑपरेशन सुरू होते. या स्फोटामुळे आसपास उभी असलेली वाहने, तसेच धान्याच्या वाहनांचे नुकसान झाले. मंगळवारीही दिवसभर परिसरातील गर्दी कायम होती. पोलिस व अग्निशमन दल घटनास्थळी गर्दी करणाऱ्या नागरिकांना हटकत होते.

‘महाराष्ट्र निसर्ग उद्यानाला कोणतीही बाधा नाही’

महाराष्ट्र निसर्ग उद्यानाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, स्फोटानंतर अग्निशमन दलाने वेळेत घटनास्थळी पोहोचून वेगाने आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे उद्यान किंवा आसपासच्या परिसरात मोठे नुकसान झालेले नाही. रस्त्यावर किंवा रस्त्यालगतच्या घरांना हानी पोहोचली नाही. रात्रभर कुलिंग ऑपरेशन सुरू होते. जेवढी काळजी घ्यायला पाहिजे; तेवढी काळजी या घटनेत घेतली गेली. त्यामुळे आग पसरली नाही.

सिलिंडर स्फोट झाला तेथे पीएमजीपी कॉलनी, निसर्ग उद्यान, शाळा-कॉलेज, व्यापारी गाळे आहेत. तेथे रस्त्याच्या दोन्ही कडेला अवजड वाहने विशेषत: सिलिंडरची वाहने उभी असतात. सायन पूल बंद केल्यापासून या रस्त्यावरील वाहनांचा ताण वाढला आहे. सिलिंडरने भरलेल्या वाहनांना येथे थारा देता कामा नये. या दुर्घटनेनंतर तरी आता कारवाई अपेक्षित आहे.-अजय वाघ, रहिवासी, धारावी

दादर व माटुंगा येथे वेगळी परिस्थिती नाही. सायन नाक्यापासून किडवाई मार्ग आणि लगतच्या परिसरात सिलिंडरची वाहने बेकायदा उभी करणे तसेच सिलिंडर भरणे, रिकामे करणे सुरू असते. मात्र वाहतूक पोलिस कारवाई करत नाहीत. धारावीतील घटनेमुळे आता नाममात्र कारवाई होईल. परंतु, पुन्हा परिस्थिती जैसे थै राहील.- मिलिंद पांचाळ, दादर

बेकायदा पार्किंग; दोषींवर कारवाई करा!- आ. ज्योती गायकवाड यांनी केली मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : धारावी परिसरात एका ट्रकमधील एलपीजी गॅस सिलिंडरची गळती झाल्याने सोमवारी रात्री ९:५० वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. ही दुर्घटना निष्काळजी आणि चुकीच्या पद्धतीने केलेल्या वाहनांच्या पार्किंगमुळे घडली आहे, असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यासंदर्भात धारावी पोलिसांत आठ जणांवर  गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, अनधिकृत वाहनांचे पार्किंग रोखण्यात अपयशी ठरलेल्या सर्व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी स्थानिक आमदार ज्योती गायकवाड यांनी केली आहे. सायन-धारावी लिंक रोडवरील धारावी बस डेपोजवळ अनधिकृतपणे उभ्या केलेल्या ट्रकमधील गॅस सिलिंडरच्या स्फोटांमुळे मोठी आग लागली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अतिशय ज्वलनशील सिलिंडर वाहून नेणाऱ्या ट्रकला अशा गर्दीच्या भागात अनधिकृतपणे पार्किंग कसे काय करू दिले जाते,  नागरिकांचा जीव महत्त्वाचा नाही का, असे सवाल आ. गायकवाड यांनी केले आहेत.

अशी घडली घटना

  • निसर्ग उद्यानाजवळील एलबीएस रोड, धारावी येथील उत्तर वाहिनी रस्त्याच्याकडेला एक मोठा ट्रक व इतर वाहने डबल पार्किंगमध्ये सोमवारी उभी करण्यात आली होती. 
  • या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात एलपीजी गॅस सिलिंडर होते. त्यामुळे या ट्रकला आग लागली. अपुऱ्या जागेत, सार्वजनिक रस्त्यावर, ज्वलनशील सामग्रीसह वाहन उभे करण्याचे हे कृत्य अतिशय धोकादायक आणि निष्काळजीचे असल्याने गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.  
टॅग्स :धारावीमुंबई