लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : महाराष्ट्रात दंगली होणार ही सातत्याने विरोधकांकडून होणारी विधाने आणि त्याला लगेच एका विशिष्ट समुदायाकडून मिळणारा प्रतिसाद, त्यातून औरंगजेब आणि टिपू सुलतानच्या उदात्तीकरणाच्या घटना या कनेक्शनची चौकशी राज्य सरकार करेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सांगितले.
नवी मुंबई आणि नागपूर अशा दोन ठिकाणी फडणवीस यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधला. कोल्हापूरमध्ये परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. कायदा कोणीही हाती घेऊ नये असे सांगून ते म्हणाले की, कोल्हापूरमध्ये विरोधी पक्षाचे एक प्रमुख नेते म्हणतात, दंगल घडविण्यात येणार आहे. त्यानंतर लगेच टिपू सुलतान आणि औरंगजेबाच्या उदात्तीकरणाच्या घटना घडतात, याचे मला आश्चर्य वाटते. या विधानाचा आणि या घटनांचा काही संबंध आहे का? याची चौकशी करण्यात येत आहे.
कोल्हापुरात अन्नपाण्याविना पर्यटकांचे हाल
कोल्हापूर : रोज हजारो पर्यटकांनी गजबजणाऱ्या कोल्हापूर शहरात बुधवारी बंदला हिंसक वळण लागल्यामुळे पर्यटकांना अक्षरश: जीवघेण्या यातना सोसाव्या लागल्या. सर्वच व्यवहार बंद झाल्याने त्यांना कोणत्याच सुविधा मिळाल्या नाहीत. बुधवारच्या बंदची पूर्वकल्पना नसल्याने सकाळपासून बागलकोट, बेळगाव, सोलापूर, पुण्यासह इतर अनेक जिल्ह्यांतील भाविक महालक्ष्मी मंदिरात आले होते. कोल्हापुरातील सर्वच हॉटेल, दुकाने बंद असल्याने भाविकांना कुठेच पाणी, जेवण मिळाले नाही. अनेकांसोबत वृद्ध महिला, लहान मुले होती. त्यांनाही याचा मोठा त्रास सहन करावा लागला.चपला, दगड, काचा उचलल्या दगडफेक झालेल्या भागात रस्त्यावर दगड, विटा, काचा, चपलांचे ढीग पडले होते. दुपारी वातावरण शांत झाल्यानंतर महापालिका कर्मचाऱ्यांनी हे ढीग हटविले. जमावातील तरुण बाहेरगावचे जमावातील अनेक तरुण हे बाहेरगावाहून आल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्या ‘टी शर्ट’वर गावांची नावे होती. ग्रामीण भागातून आलेल्या कार्यकर्त्यांचा भरणा अधिक होता. हेच कार्यकर्ते अधिक आक्रमक हाेते.
गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : नाना पटोले
राज्य सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरले आहे. फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
दगडफेकीमागचे सूत्रधार शोधा : अनिल परब
दगडफेकीमागील सूत्रधार कोण? याला कोणत्या राजकीय पक्षाचा पाठिंबा आहे का, हे शोधले पाहिजे. दबावाखाली याची चौकशी होता कामा नये, अशी मागणी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी केली.