Join us

जगायचे कसे? घरगुती गॅस सिलिंडर पुन्हा २५ रुपयांनी महागले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2021 4:06 AM

मुंबई : मागील दीड वर्षापासून कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला सामान्य जनता मोठी त्रासली आहे. अशातच आता नागरिकांना महागाईला सामोरे ...

मुंबई : मागील दीड वर्षापासून कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला सामान्य जनता मोठी त्रासली आहे. अशातच आता नागरिकांना महागाईला सामोरे जावे लागत आहे. मागील काही महिन्यांत पेट्रोल, डिझेल व गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्याने नेमका घरखर्च चालवावा कसा, असा प्रश्न सर्वसामान्यांसमोर उभा ठाकला आहे.

कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, तर अनेकांच्या उद्योगधंद्यांवर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे सर्वसामान्य कुटुंबांतील आर्थिक गणितेदेखील बिघडली आहेत. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती दर महिन्याला वाढत आहेत. मागील महिन्यात सिलिंडरच्या किमती १० रुपयांनी कमी झाल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, आता गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा एकदा २५ रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे गृहिणींना चिंता सतावू लागली आहे.

...असे वाढले गॅसचे दर

महिना घरगुती व्यावसायिक

२०२०

ऑगस्ट - ५९४. १,०९१

सप्टेंबर - ५९४. १,०९१

ऑक्टोबर - ५९४. १,११४

नोव्हेंबर - ५९४. १,१९०

डिसेंबर - ६४४. १,२८१

२०२१

जानेवारी - ६९४. १,२९७

फेब्रुवारी - ७१९. १,४८२

मार्च - ८१९. १,५६३

एप्रिल - ८०९. १,५९०

मे - ८०९. १,५४५

जून - ८०९. १,५४५

जुलै - ८३४. १,५४५

झोपडपट्ट्यांमध्ये पुन्हा चुली पेटल्या

अनिता लोंढे- इंधनाची दरवाढ झाल्याने अनेक जण आता प्रवासासाठी सायकलचा पर्याय वापरत आहेत. त्याप्रमाणे आता गॅस सिलिंडरचे दर वाढत असल्याने आम्हाला पुन्हा एकदा चुली पेटवाव्या लागत आहेत. सकाळी अंघोळीसाठी पाणी तापविण्यापासून अन्न शिजवतानादेखील चुलीचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे सरकार आम्हाला पुढे नेत आहे की मागे, हा प्रश्न पडला आहे.

खर्च कसा भागवायचा?

सुनेत्रा वाळके- आधीच मागील काही महिन्यांपासून वाढीव वीज बिल येत आहे. त्यात सिलिंडरच्या किमती दर महिन्याला वाढत आहेत. यामुळे घरखर्च चालविणे कठीण होऊन बसले आहे. सरकारने सामान्य माणसाची पिळवणूक थांबवायला हवी.

वत्सला रणदिवे- कोरोनामुळे घरातील बजेटचे कंबरडे मोडले आहे. त्यात महागाईमुळे कुठलाच खर्च परवडत नाही. इंधन, गॅस, भाज्या, कपडे सर्वांचेच दर वाढल्यामुळे आता नेमका संसार चालवायचा कसा, हा प्रश्न उपस्थित होत आहे. शासनाने गॅस सिलिंडरचे दर कमी करून सामान्यांना दिलासा द्यायला हवा.