मुंबई : अनेकदा प्रवाशांना एसटी स्टॅण्डवर येऊन बसची वाट पाहत ताटकळत बसावे लागते. गावी जाणारी एसटी कुठवर आली, कधी येणार वगैरेची उत्तरे खिडकीवर समाधानकारकरीत्या मिळत नाहीत. मात्र, लवकरच हा अनुभव सर्व इतिहासजमा होणार आहे. कारण, तुम्हाला हव्या त्या एसटी बसचा ठावठिकाणा लगेचच कळू शकणार आहे. त्यासाठी एसटी महामंडळाने सर्व गाड्यांमध्ये व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टीम (व्हीटीएस) ही प्रणाली बसविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर काही गाड्यांमध्ये ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. काही ठिकाणी स्क्रिनच्या अडचणी असून, येत्या आठ दिवसांत ‘लाइव्ह लोकेशन’ प्रणालीचे काम पूर्ण होईल, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.
रेल्वेच्या धर्तीवर राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांच्या सोयीसाठी ‘व्हीटीएस’ यंत्रणा कार्यान्वित करत आहे. ही यंत्रणा बसविल्यानंतर प्रवाशांना संबंधित एसटी कोणत्या भागातून धावत आहे, तिचे शेवटचे लोकेशन काय होते, संबंधित बसस्थानकावर येण्यास किती वेळ लागणार आहे, तसेच सुटण्याची आणि पोहोचण्याची वेळ काय, हे सर्व समजू शकणार आहे. त्यासाठी आगारांमध्ये डिस्प्ले बोर्ड बसविण्यात आले असून, ते लवकरच कार्यान्वित होणार आहेत. अपघात झाल्यास तत्काळ अपघातस्थळी मदत पोहोचविता यावी यासाठीही या यंत्रणेचा लाभ होणार आहे.