मुंबई - शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 रोजी सुरू केलेल्या शिवसेना पक्षाला आज 55 वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी फेसबुकद्वारे राज्यातील शिवसैनिकांशी संवाद साधला. भाषणाच्या सुरुवातीलाच हे भाषण करताना, समोर जल्लोष करणारे शिवसैनिक नसल्याने हा संवाद मला भाषण वाटत नाही, असे उद्धव ठाकरेंनी म्हटलं. उद्धव ठाकरेंनी आपल्या लाईव्ह संवादात स्वबळावर लढण्याचा नारा देणाऱ्यांना सुनावले. तसेच, हिंदुत्त्व म्हणजे काय हेही समजावून सांगताना, युती अन् आघाडीबाबतही भाष्य केलं.
मुख्यमंत्र्यांची झूल बाजूला ठेवून, मी शिवसेना कुटुंबातील माता-भगिनींशी आणि बांधवांशी संवाद साधतोय. हे 55 वर्ष सर्वच शिवसैनिकांचं आहे. शिवसैनिकांच्या आुयष्यात तीन सण असतात. बाळासाहेबांचा जन्मदिवस 23 जानेवारी, शिवसेनेची स्थापना 19 जून आणि 13 ऑगस्ट मार्मिकचा वर्धापन असलेला दिवस, हे तीन दिवस सणासारखे असतात. शिवसेना गेल्या 55 वर्षांपासून संकटांचा सामना करेतय. मी आजही संकटाचा सामना करतोय, जो संकटांचा सामना करत नाही तो शिवसैनिक कसा?, असा प्रश्नच उद्धव ठाकरेंनी विचारला. 55 वर्षे ही साधीसुधी वाटचाल नाही, शिवसेना केवळ सत्तेसाठी लढली असती, तर शिवसेना टिकलीच नसती. शिवसेना आजही शिवसैनिकांच्या जोरावरच पुढे जात आहे.
शिवसेनेनं महाविकास आघाडी केली म्हणजे हिंदुत्व सोडलं का, असा अनेकांचा गैरसमज होतो. पण, हिंदुत्व म्हणजे पेटंट कंपनी नाही, हे माझचं... हे गेलं म्हणजे हिंदुत्त्व सोडलं असं नाही. शिवसेनाप्रमुख सांगायचे हिंदुत्व म्हणजे आमचा श्वास आहे, जर श्वासच थांबला तर आयुष्याला काय अर्थ आहे. त्यामुळे, कोणी गरैसमज करुन घेण्याची गरज नाही की, यांनी युती तोडली, आता आघाडी केली, आघाडी किती काळ टिकणार... बघुया पुढे, त्याची काळजी कशाला करता... जोपर्यंत आमचा हेतू प्रामाणिक आहे, राज्याचा विकास करणं, गोरगरिबांचा आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करणं, त्यासाठी जर काही करावं लागत असेल, तर त्याचा अर्थ हे सोडलं अन् ते धरलं असं होत नाही.
हिंदुत्व म्हणजे काय असतं शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसांना हिंदवी स्वराज्याची आठवण करुन दिली, त्यांच्या मनगटातील ताकदिची जाणीव करुन दिली, तेव्हा मराठी माणूस पेटून उठला. त्याच मराठी माणसांची ही शिवसेना आहे. मराठी माणसाच्या न्यायाहक्कासाठी, हिंदुत्त्वासाठी नक्कीच लढेल. हिंदुत्व आमचा देशाभिमान आहे, त्यानंतर प्रादेशिक अस्मिता असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटलं. आपलं राजकारण सोडून देशावर प्रेम करणारा शिवसेनेएवढा दुसरा पक्ष नाही. हिंदुत्व म्हणजे पेटंट कंपनी नाही, हे माझचं म्हणजे हिंदुत्त्व नाही. हिंदुत्व म्हणजे आमचा श्वास आहे. आघाडी किती काळ टिकेल, हे पाहुया पुढे. राजकारण सध्या वळत-वळत चाललंय. कोरोना काळात चाललेलं राजकारण हे विकृतीकरण आहे. सत्ताप्राप्ती माझ्यासाठी नव्हतं, पण जबाबदारी आल्याने ती स्विकारावी लागली. ममता बॅनर्जींचं कौतुक
ममता बॅनर्जींसह पश्चिम बंगालच्या जनतेचं कौतुक करावं वाटतं, बंगालने आत्मबळ दाखवून दिलं. देशाला वंदे मातरम हा मंत्रही पश्चिम बंगालनेच दिला. पश्चिम बंगालने सुभाषचंद्र बोस दिले, बंकिमचंद्र चटर्जी दिले, खुदीराम बोस दिले, त्याचं बंगालने स्व:त्व दाखवून दिलं. प्रादेशिक अस्मिता जपली पाहिजे हेच बंगालने दाखवून दिलं. विधानसभा निवडणुकांमध्ये अनेक हल्ले अंगावर झेलत बंगालच्या माणसांनी आपलं मत निर्भीडपणे मांडलं.
भाजपा-शिवसेना वादावरही अप्रत्यक्ष टिपण्णी
रक्तपात करणं ही शिवसेनेची ओळख नाही, पण मुद्दामून शिवसैनिकाला कुणी डिवचत असेल तर रक्तदान करणारीही शिवसेना आहे. कोरोना काळातही मी केलेल्या आवाहनास शिवसैनिकांनी मोठा प्रतिसाद दिला. त्यावेळी, शिवसैनिकांनी विचारलं नाही, ते रक्त कुणाला दिलं जातंय. ते रक्त माणुसकीला दिलं जातंय, हे शिवसैनिकाला माहितीय.
स्वबळाचा नारा देणाऱ्याना लगावला टोला
सध्याच्या परिस्थितीत राजकारण आणि निवडणुकांचा विचार करताल, तर लोकं जोड्यानं हाणतील, एकहाती सत्ता आणू म्हणणाऱ्यांना लोकं विचारतील. आपला देश अस्वस्थतेकडे चालला आहे. सत्ता हवीय, सत्ता मिळेल, पण जनतेसाठी त्याचा उपयोग कसा करणार हे महत्त्वाचं आहे. निवडणुकांचा विचार बाजूला ठेवून सर्वच राजकीय पक्षांनी आर्थिक संकटाचा विचार करायला हवा.