मुंबई - एलफिन्स्टन - परळ रेल्वे ब्रिजवर चेंगराचेंगरी होऊन झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभुमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्या गुरुवारी मोर्चाचं आयोजन केलं आहे. चर्चगेटवरील पश्चिम रेल्वेच्या कार्यालयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मोर्चा काढण्यात येणार असून स्वत: राज ठाकरे या मोर्चात सहभागी होणार आहेत. शनिवारी आपल्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी मोर्चा काढत असल्याची माहिती दिली होती. यावेळी प्रवाशांना मिळत नसणा-या सुविधांबद्दल जाब विचारला जाणार आहे. दरम्यान राज ठाकरे यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत सर्वांना मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.
काय लिहिलं आहे पोस्टमध्ये - - एलफिन्स्टन चेंगराचेंगरीत लोक मरण पावली कारण रेल्वे प्रशासनानं आणि सरकारनं लोकांच्या साध्या सुविधांचादेखील आजपर्यंत विचार केला नाही. आपल्याला याचा धिक्कार केलाच पाहिजे. साध्या साध्या गोष्टी सुद्धा सरकार लोकांना देऊ शकत नसेल तर या सरकारचा काय उपयोग ? सरकार आणि माणसं बदलून परिस्थिती सुस्थितीत येत नसते, त्यासाठी सरकारमधील माणसांच्या जिवंत असाव्या लागतात. अनेक जण या मोर्चाकडे राजकारण म्हणून पहातीस. नमो रुग्ण तर तसेच पाहतात. त्यांचे सोडा.- मोर्चा जरी आम्ही आयोजित करत असतो तरी हा पक्षाचा मोर्चा नाही, जनतेचा आहे.- किती दिवस तुम्ही तमाशा बघत राहणार ? जाहिरातबाजीचा तमाशा, नवनव्या घोषणा करुन धूळफेकीचा तमाशा. योगाचा तमाशा, स्वच्छ भारताचा तमाशा. मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडियाचा तमाशा. - आज एक अघोषित आणीबाणी आहे. तिच्याविरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे.
रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी मध्य-पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक, विभागीय व्यवस्थापक प्रवासी संघटनांना वेळ देत नाहीत. हे चालणार नाही. या बैठकांना वेळ द्या; नाहीतर बघून घेऊ, असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी दिला होता. मनसेतर्फे ५ ऑक्टोबरला केल्या जाणा-या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रवासी संघटनांकडून प्रश्न समजून घेतले. त्यावेळी ते बोलत होते.
एलफिन्स्टन रेल्वे स्थानकातील चेंगराचेंगरीतील २४ प्रवाशांच्या हत्याकांडाची गंभीर दखल ठाकरे यांनी घेतली असून या घटनेचा निषेध आणि प्रवाशांच्या समस्यांबद्दल आक्रोश व्यक्त करण्यासाठी मनसे ५ ऑक्टोबरला चर्चगेटच्या पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांच्या कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. तत्पूर्वी त्यांनी सोमवारी प्रवासी संघटनांच्या पदाधिका-यांची भेट घेत सर्वसामान्य प्रवाशांच्या व्यथा जाणून घेतल्या. ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी ठाकरेंनी ही बैठक घेतली.
मुंबईची उपनगरे विशेषत: ठाणे जिल्ह्यातील प्रवाशांना लोकल सेवेवरच अवलंबून रहावे लागते. त्यांना रेल्वेशिवाय कोणताही पर्याय नाही. समांतर रस्त्याचा अभाव असल्याने रेल्वे सेवा कोलमडली, की सुमारे ४० लाख प्रवाशांच्या रोजंदारीचा प्रश्न निर्माण होतो. कसारा, कर्जत मार्गावरील लाखो प्रवाशांना त्यांच्या रोजगारावर पाणी सोडावे लागते. गेल्या सहा महिन्यात रोज लेटमार्क होत असून रुळावरुन गाडी घसरणे, अपघात, सिग्नल यंत्रणा खराब, रेल्वे रुळाला तडे यासारख्या असंख्य घटनांमुळे प्रवासी हैराण झाले आहेत. सकाळी कामावर जाण्याचा प्रवास सुखकर झाला, तर रात्री घरी परतण्याच्या वेळी काही घोळ होतो का, असा ताण मनावर असतो. त्यात एलफिन्स्टनची घटना घडली. पण त्याची जबाबदारी घेण्यास कोणी तयार नाही. आरोप-प्रत्यारोप करत अधिकारी एकमेकांवरील जबाबदारी ढकलून मोकळे होत आहेत. अशा स्थितीत सर्वसामान्य प्रवाशांचे काय? त्यांना कोणीही वाली नाही. पादचारी पुलांअभावी रेल्वे रुळ ओलांडण्यामुळे अपघात होत असतील; तर पादचारी पूल वेळेत तयार करा, अरुंद पुलांना मोठी जागा करुन द्या. स्थानकातील फेरीवाले, अस्वच्छ स्वच्छतागृहे, भटके कुत्रे, गर्दुल्ले यामुळे प्रवासी मेटाकुटीला आले आहेत. त्यासाठी मनसेने आवाज उठवला हे योग्य आहे. पण त्यात सातत्य हवे, अशी मागणी उपस्थित प्रवासी संघटनांच्या पदाधिकाºयांनी केली. हीच समस्या कमी-अधिक प्रमाणात मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या स्थानकांत आहे. त्यातही मध्य रेल्वेच्या दादर, ठाणे, कळवा, दिवा, डोंबिवली, आसनगाव, कसारा, बदलापूर, अंबरनाथ आदी स्थानकांमध्ये ती तीव्र आहे. प्रवासी रोज जीव मुठीत धरुन प्रवास करतात. त्यांना सुरक्षित, संरक्षित प्रवासाची हमी हवी आहे. ती मिळत नसल्याने समस्या वाढत असल्याचे सांगण्यात आले.
त्याच्याशी सहमत होत ठाकरे यांनी रेल्वे प्रशासनाला प्रवाशांच्या समस्यांबाबत गांभीर्य नसल्याचे सांगितले. प्रवाशांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी अधिकारी भेट कशी देत नाहीत, ते आपण बघूच. पुढील काळात सातत्याने बैठका होतील, असे आश्वासन त्यांनी दिले. ५ आॅक्टोबरला प्रवाशांनी जास्तीत जास्त संख्येने यावे आणि स्वत:लाच न्याय मिळवून देण्यासाठी थोडा वेळ काढावा, असे आवाहन त्यांनी प्रवासी संघटनांना केले.