मुंबई : फौजदारी दंडसंहिता १५६ अंतर्गत प्रलंबित असलेल्या सर्व खटल्यांची माहिती दोन आठवड्यांत सादर करण्याचे निर्देश बुधवारी उच्च न्यायालयाने मुख्य महानगर दंडाधिकारींच्या निबंधकांना दिले. सीआरपीसी १५६ अंतर्गत पोलिसांना दखलपात्र गुन्ह्यांचा तपास करण्याचा अधिकार आहे. नोव्हेक्स प्रा. लि. या कंपनीने मुंबई व नवी मुंबईमध्ये अनेक हॉटेल्सविरुद्ध कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे नोंदवण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी गुन्हे नोंदवण्यास नकार दिला.दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता त्यांनीही एक वर्ष उलटून गेले तरीही केसवर सुनावणीच घेतली नाही. अखेरीस कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेतली. यशराज फिल्म्स आणि झी म्युझिकच्या ग्राऊंड परफॉर्मन्सचे कॉपीराइट ‘नोव्हेक्स’कडे आहेत. याचाच अर्थ या दोन्ही बॅनरची गाणी म्युझिक सिस्टीमवर किंवा आॅर्केस्ट्रामध्ये गायची असल्यास नोव्हेक्स कंपनीकडून परवाना घेणे बंधनकारक आहे. मात्र मुंबई व नवी मुंबईच्या हॉटेल्समध्ये दोन्ही बॅनरची गाणी सर्रास बेकायदेशीरपणे लावली जातात. याविरुद्ध ‘नोव्हेक्स’ने संबंधित हॉटेल्सविरुद्ध तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी गुन्हे नोंदवण्यास नकार दिला. ‘दंडाधिकारी तक्रारीवरील सुनावणीस करत असलेल्या विलंबामुळे पोलीस तपासास विलंब होईल आणि पुरावेही नष्ट होतील,’ अशी भीती याचिकाकर्त्या कंपनीने व्यक्त केली. (प्रतिनिधी)
‘सीआरपीसी १५६ अंतर्गत किती खटले प्रलंबित?’
By admin | Published: March 16, 2017 4:00 AM