मुंबई : विवाह संकेतस्थळांकडून फसवणूक करण्यात आल्याबद्दल किंवा या संकेतस्थळांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे हुंड्याची मागणी केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार स्थापन करण्यात आलेल्या तक्रार निवारण कक्षात आतापर्यंत किती तक्रारी करण्यात आल्या आहेत व त्यावर काय कारवाई करण्यात आली आहे, याची तपशीलवार माहिती देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सरकारला दिले. विवाह संकेतस्थळांकडून विवाहेच्छुकांची फसवणूक करण्यात येत असल्याचा आरोप व्यवसायाने वकील असलेल्या प्रिसीला सॅम्युअल यांनी याचिकेद्वारे केला आहे. याचिकेनुसार, नोंदणी केलेल्या विवाहेच्छुक वधू-वरांचे प्रोफाईल अद्ययावत करण्यात येत नाहीत. तसेच काही विवाह संकेतस्थळांकडून उघडपणे हुंडाही मागण्यात येतो. उमेदवाराने दिलेल्या माहितीची पडताळणी न करताच संकेतस्थळे ती माहिती अपलोड करतात.राज्य सरकारला अशा विवाह संकेतस्थळांवर कारवाई करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. सोमवारच्या सुनावणीत केंद्र सरकारने फसवणूक करणाऱ्या संकेतस्थळांवर आयटी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल, अशी माहिती न्या. हिमांशु केमकर व एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाला दिली.तक्रार निवारण कक्षामध्ये आतापर्यंत किती तक्रारी नोंदविण्यात आल्या व त्यावर काय कारवाई करण्यात आली, असे प्रश्न राज्य सरकारला विचारत कोर्टाने माहिती देण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)
विवाह संकेतस्थळांविरुद्ध किती तक्रारी आल्या?
By admin | Published: October 04, 2016 5:02 AM