"'इंडिया'च्या बैठकीसाठी जमलेले किती नेते बाळासाहेबांच्या स्मारकाला भेट देणार?"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 02:00 PM2023-08-31T14:00:29+5:302023-08-31T14:01:18+5:30
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा उल्लेख माफीवीर अशा हेटाळणीने करणाऱ्या राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेत त्याचं स्वागत आदित्य ठाकरेंनी मिठी मारून करावं, हे दुर्दैवी आहे असा टोला खा गजानन किर्तीकर यांनी लगावला.
मुंबई - सत्तेच्या अमिषाने एकत्र आलेल्या इंडिया आघाडीतील अनेकांनी बाळासाहेबांचा सतत विरोधच केला. उद्धव ठाकरेंना या सर्वांचा एवढाच पुळका असेल, तर त्यांनी या सर्वांना घेऊन बाळासाहेबांच्या स्मारकावर जावं. तिथे जाऊन या सर्वांना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करायला लावावं असं खुलं आव्हान शिवसेना नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंना दिलं.
मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, ही मुंबई हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची मुंबई आहे आणि दुर्दैवाने याच शहरात त्यांचा मुलगा बाळासाहेबांनी आयुष्यभर ज्यांना विरोध केला, त्यांच्यासमोरच लाचारी करत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींना उद्धव ठाकरे माफी मागायला लावणार का?. इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी जमलेले किती नेते बाळासाहेबांच्या स्मारकस्थळी जाऊन त्यांना आदरांजली वाहणार? असा परखड सवाल त्यांनी ठाकरे गटाला विचारला.
त्याचसोबत लालुप्रसाद यादव, समाजवादी पक्ष, काँग्रेस या भ्रष्ट नेत्यांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसत आहेत. हा बाळासाहेबांच्या विचारांविरोधात दगा आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर काँग्रेसच्या विचारधारेला विरोध केला. एक वेळ पक्ष विसर्जित करेन, पण शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, अशी भूमिका बाळासाहेबांनी आयुष्यभर घेतली. उद्धव ठाकरे त्याच काँग्रेसच्या ताटाखालचं मांजर बनले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा उल्लेख माफीवीर अशा हेटाळणीने करणाऱ्या राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेत त्याचं स्वागत आदित्य ठाकरेंनी मिठी मारून करावं, हे दुर्दैवी आहे असा टोला खा गजानन किर्तीकर यांनी लगावला.
दरम्यान, हे सर्व पक्ष घराणेशाहीचा परिपाक आहेत. या आघाडीत सामील झालेल्या पक्षांपैकी १७ पक्ष हे घराणेशाही पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांना देशाच्या विकासाची काहीच पडलेली नाही. कारसेवकांवर गोळ्या झाडणाऱ्या समाजवादी पक्षासोबत, राम मंदिरासाठी निघालेली रथयात्रा अडवून अडवाणींना अटक करणाऱ्या लालुप्रसाद यादवांसोबत आणि उद्दाम व्यक्तिमत्त्वाच्या राहुल गांधींसोबत उद्धव यांनी बसावं हे वाईट आहे असंही खासदार किर्तीकर यांनी म्हटलं.
... तर उद्धव यांनी युती तोडली असती का ?
उद्धव ठाकरे यांनी केवळ स्वत:ला मुख्यमंत्रीपद मिळावं, म्हणून या सर्व कोलांट्याउड्या मारल्या. भाजपाने त्यांना पाच वर्षं मुख्यमंत्रीपद देऊ केलं असतं, तर त्यांनी युती तोडली असती का, या प्रश्नाचं उत्तर उद्धव यांनी द्यावं. निवडणुकीनंतर उद्धव मोदींना भेटले होते. आपल्या युतीचा विजय झाल्याने आपलीच सत्ता येईल, एवढी बोलणी झाली होती. पण नंतर मुख्यमंत्रिपदामुळे त्यांची मती फिरली असा घणाघात मंत्री केसरकर यांनी केला. तसंच २०१४ मध्ये न मागता शरद पवार यांनी भाजपाला स्थिर सरकार बनवण्यासाठी पाठिंबा दिला होता. आताही पवार साहेबांनी स्थिर सरकारासाठी आमच्यासोबतच यावं असं केसरकर म्हणाले.
जनतेने तुम्हाला नाकारलं आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भ्रष्टाचाराविरोधात मोहीम सुरू झाली आणि त्यात तुमच्यापैकी काहींची चौकशी झाली, तर ती लोकशाहीविरोधी कारवाई नसते. देशात लोकशाही नसती, तर इतर राज्यांमध्ये तुमची सरकारं कशी आली असती? देश प्रगतीकडे वाटचाल करत आहे. सामान्य माणूस सुखी होत आहे आणि तुम्हाला आता लोकशाहीचा पुळका आला आहे. पण देशाने, देशातल्या लोकांनी तुमच्या भ्रष्ट आघाडीला नाकारलं आहे, हे लक्षात ठेवा असा इशाराही केसरकर यांनी दिला.
मोदीच सक्षम नेतृत्व
हे विरोधक सत्तेत आल्यावर चीनला अरुणाचल प्रदेशातून मागे ढकलण्याची भाषा करतात. पण ते त्यांना शक्य नाही. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याएवढं सक्षम नेतृत्व या लोकांकडे नाही. मोदींच्या काळात देशाने दैदिप्यमान प्रगती केली आहे. पूर्वी आपल्या देशात शस्त्रास्त्र तयार होत नव्हती. आता आपण त्या आघाडीवरही सक्षम झालो आहोत. आज जगभरातील देश भारतात गुंतवणूक करण्यासाठी पुढे सरसावत आहेत. या गुंतवणुकीतून रोजगार निर्मिती होणार आहे. त्यामुळेच या विरोधकांना रोजगाराचा मुद्दा आता आठवला असंही केसरकर म्हणाले.