Join us  

राडारोडा हटविण्याला आणखी किती दिवस? ज्वलनशील पदार्थांच्या साठ्यामुळे आग लागण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 9:34 AM

ढिगाऱ्याखाली पेट्रोल पंप असल्याने इंधन, गॅससारख्या ज्वलनशील पदार्थांच्या साठ्यामुळे बचाव मोहिमेत काळजीपूर्वक हाताळणी केली जात आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : घाटकोपरमध्ये कोसळलेल्या होर्डिंगचे सुटे भाग करून घटनास्थळावरील राडारोडा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामात महापालिकेच्या यंत्रणा, अग्निशमन दल, मुंबई पोलिस, १०८ रुग्णवाहिका सेवा, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक, भारत पेट्रोलियम, महानगर गॅस आणि इतर सर्व संबंधित शासकीय, तसेच बाह्ययंत्रणा आपसात समन्वय राखून सातत्याने कार्यरत आहेत. ढिगाऱ्याखाली पेट्रोल पंप असल्याने इंधन, गॅससारख्या ज्वलनशील पदार्थांच्या साठ्यामुळे बचाव मोहिमेत काळजीपूर्वक हाताळणी केली जात आहे. 

दुर्घटना झालेल्या ठिकाणी कोसळलेल्या फलकाचे प्रारंभी सुटे भाग करण्यात आले. या सुट्या भागांसह राडारोडा हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मुंबई अग्निशमन दलामार्फत घटनास्थळी १२ फायर इंजिन, २ आरव्ही, १ सीपी, १ एचपीएलव्ही, १ डब्ल्यूक्यूआरव्ही, १ एमएफटी, १०८ आणीबाणी रुग्णसाहाय्य सेवेच्या २५ रुग्णवाहिका, तर १ प्रमुख अग्निशमन अधिकारी, २ उपप्रमुख अग्निशमन अधिकारी, ५ वरिष्ठ केंद्र अग्निशमन अधिकारी, ६ केंद्र अग्निशमन अधिकारी तैनात आहेत, तर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त, १ सहायक आयुक्त, १ कार्यकारी अभियंता, ३ सहायक अभियंता,  १ कनिष्ठ अभियंता, २ मुकादम, ७५ कामगारांसह २५ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक जीवरक्षक उपकरणांसह घटनास्थळी तैनात आहेत. 

१० जेसीबी, १० ट्रक, ५ पोकलेन, २ खासगी गॅस कटर्स टीम, २ हायड्रोलिक क्रेन्स, २ हायड्रा क्रेन्स,  ३ वॉटर टँकर्स, मेट्रो व एमएमआरडीएचे ५० कामगार, १० आपदा मित्र असे मनुष्यबळही कार्यरत आहे.

 

टॅग्स :घाटकोपरमुंबई