'आणखी किती स्वप्नीलच्या आत्महत्येची आपण वाट पाहणार आहोत?'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 01:30 PM2021-07-05T13:30:44+5:302021-07-05T13:31:35+5:30
राज्य सरकारला आजवर एमपीएससीची पदे भरता आली नाहीत. त्यामुळे स्वप्नील लोणकरने सर्व परीक्षा पास करूनही मुलाखत, नियुक्ती झाली नाही म्हणून आत्महत्या केली.
मुंबई - राज्य सरकारच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच एमपीएससी परीक्षांचा मुद्दा सभागृहात गाजला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी स्वप्नील लोणकर या युवकांच्या आत्महत्येवरुन सभागृहात सत्ताधारी पक्षाला धारेवर धरले. सभागृहातील बाकीचे सगळे विषय बाजूला ठेवून अगोदर एमपीएससीसंदर्भात चर्चा करा, असी आक्रमक भूमिका फडणवीसांनी घेतली. तसेच, स्वप्नील लोणकरप्रमाणे राज्यातील आणखी किती आत्महत्येची आपण वाट पाहणार आहोत? असा संतापजनक सवालही त्यांनी उपस्थित केला.
राज्य सरकारला आजवर एमपीएससीची पदे भरता आली नाहीत. त्यामुळे स्वप्नील लोणकरने सर्व परीक्षा पास करूनही मुलाखत, नियुक्ती झाली नाही म्हणून आत्महत्या केली. यासाठी राज्य सरकारने स्वप्निलच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत द्या, अशी मागणी विधानसभेमध्ये भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली. तर, देवेंद्र फडणवीस यांनीही या मुद्द्यावरुन सरकारला धारेवर धरले होते. स्वप्निल लोणकर या विद्यार्थ्याची आत्महत्या चिंताजनक आहे. एमपीएससी कुणाच्या व्यथा ऐकून घ्यायला तयार नाही. आणखी किती स्वप्नीलच्या आत्महत्यांची आपण वाट पाहणार आहोत. राज्य सरकार केव्हा लक्ष देणार आहे? असे म्हणत स्थगन प्रस्तावाद्वारे फडणवीसांनी हा विषय सभागृहात मांडला होता.
स्वप्निल लोणकर या विद्यार्थ्याची आत्महत्या चिंताजनक आहे.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 5, 2021
एमपीएससी कुणाच्या व्यथा ऐकून घ्यायला तयार नाही.
आणखी किती स्वप्निलच्या आत्महत्यांची आपण वाट पाहणार आहोत. राज्य सरकार केव्हा लक्ष देणार आहे?
स्थगन प्रस्तावाद्वारे हा विषय विधानसभेत मांडला!#MonsoonSession#MPSCpic.twitter.com/RzSYFryMkU
दरम्यान, देवेंद्र फडणवीसांच्या या मागणीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ३१ जुलै २०२१ प्रयंत एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची घोषणा अधिवेशनात केली. तसेच, राज्य सराकरला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाला अनुसरुन काम करावे लागते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
24 वर्षीय तरुणाची आत्महत्या
MPSC हे मायाजाल आहे असं म्हणत एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या एका तरुणानं पुण्यात आत्महत्या केली आहे. पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या स्वप्नील लोणकर असं या २४ वर्षाच्या तरुणाचं नावं आहे. आत्महत्या करण्यापूर्वी स्वप्नीलने लिहिलेल्या सुसाईड नोटमधे आर्थिक परिस्थितीला कंटाळून आणि एमपीएससीची परीक्षा प्रक्रिया रखडल्याने आत्महत्या करत असल्याच म्हटलं आहे. एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरही २ वर्षे मुलाखत झालीच नाही आणि स्वप्निल हळूहळू नैराश्यात गेला. या काळात घरची परिस्थिती आणि परीक्षेनंतर नोकरी लागेल या आशेवर घेतलेलं कर्ज यासारख्या कारणांमुळेही स्वप्निलवरील तणाव वाढत गेल्याने त्यांने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.