Join us

अजून किती जणांची हकालपट्टी करणार?, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2022 6:37 PM

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या खासदारांमध्येही नाराजी असल्याचे बोलले जात आहे.

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी तब्बल ४० आमदारांसह बंड पुकारत शिवसेनेला धक्का दिला. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेससोबत (Congress) महाविकास आघाडीतून बाहेर पडावे व भाजपसोबत (BJP) सत्तेत यावे अशी बंडखोरांची मागणी होती. पण, उद्धव यांनी फारसा सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने बंडखोर आमदारांच्या शिंदे गटाने भाजपासोबत येत महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. त्यानंतर, शिवसेनेकडूनही नेत्यांना धक्के देण्यात येत आहेत. आता, खासदार भावना गवळी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यावरुन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रमुखांना थेट सवाल केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या खासदारांमध्येही नाराजी असल्याचे बोलले जात आहे. शिवसेना खासदार भावना गवळी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित शिवसेनेने भाजपसोबत हातमिळवणी करावी असे अप्रत्यक्षपणे सांगितले होते. त्यानंतर शिवसेनेकडून भावना गवळींनाच धक्का देण्यात आला. लोकसभेत शिवसेनेच्या प्रतोद पदावरुन भावना गवळी यांना हटवण्यात आले असून त्या जागी राजन विचारे (Rajan Vichare) यांची चिफ व्हिप म्हणजे मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती केल्याची माहिती आहे. संजय राऊत यांच्या लेटरहेडवरून हे आदेश जारी करण्यात आले आहेत. यासंदर्भात एकनाथ शिंदेंनी पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, आणखी किती जणांची हकालपट्टी करणार, असा थेट सवाल शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. दरम्यान, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमुळे सध्या शिवसेना अलर्ट मोडमध्ये गेल्याची चर्चा आहे.

भावना गवळी यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईनंतर अजून किती जणांची हाकालपट्टी करणारा असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. आम्ही शिवसेनेतच आहोत आम्ही शिवसैनिकच आहोत असंही वक्तव्य त्यांनी पुन्हा केले. कायद्याने आणि नियमाने आम्हाला आमचे पद कायम ठेवलेले आहे, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

राहुल शेवाळेचं पत्र योग्यच

संभाजी नगरच्या नावावरून एमआयएमने विरोध दर्शवला असताना कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आवाहन शिंदे यांनी केले आहे. रस्त्यावर उतरण्याची भाषा करण्यापेक्षा समोरासमोर येऊन चर्चा करा, असं आवाहनही त्यांनी केले. तसेच, राष्ट्रपती पदासाठी मुर्मू मॅडम या आदिवासी समाजाच्या आहेत, त्यांना राष्ट्रपती म्हणून मतदान करावे, याबाबत राहुल शेवाळे यांनी जे पत्र दिलय ते योग्यच आहे, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

टॅग्स :एकनाथ शिंदेउद्धव ठाकरेमुंबईशिवसेनाभावना गवळी