आणखी किती बळी घेणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 01:33 AM2019-07-17T01:33:48+5:302019-07-17T01:33:55+5:30
मालाड येथील जलाशयाची भिंत झोपड्यांवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत तब्बल ३० मुंबईकरांचे बळी गेले.
मुंबई : मालाड येथील जलाशयाची भिंत झोपड्यांवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत तब्बल ३० मुंबईकरांचे बळी गेले. गोरेगाव येथे गटरात पडून दीड वर्षीय दिव्यांशचा मृत्यू झाला. वरळी येथे कोस्टल रोडच्या बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून बबलूचा मृत्यू झाला. धारावी येथे मिठी नदीत पडून सुमीतचा मृत्यू झाला. या घटना घडत असतानाच मंगळवारी डोंगरी येथे इमारत कोसळून १० जणांचा मृत्यू झाल्याने, आता मुंबईकरांचा संताप अनावर झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे, हे सुस्त प्रशासन आणखी किती मुंबईकरांचा जीव घेणार आहे? असा संतप्त सवाल मुंबईकरांकडून केला जात आहे.
पावसाळा सुरू झाल्यापासून घडत असलेल्या आपत्कालीन घटनांनी मुंबईकरांचे नाहक बळी जात आहेत. कुठे बांधकाम कोसळत आहे, कुठे झाडे कोसळत आहेत, कुठे शॉर्टसर्किटच्या घटना घडत आहेत. परिणामी, मुंबईकरांचा जाच दिवसागणिक वाढतच आहे. महत्त्वाचे म्हणजे, अशा आपत्कालीन घटनांचा विचार करता, २०१३ सालापासून २०१८ सालापर्यंत मॅनहोल, गटार, समुद्रात पडल्याच्या ६३९ दुर्घटनांत ३२८ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दुर्घटना रोखण्यासाठी उपाय योजना करणार का, असा सवाल होत आहे़
>विविध दुर्घटना
वर्ष घटना जखमी मृत
२०१३ ८० २४ ३७
२०१४ १०३ २७ ६४
२०१५ ८५ २४ ४५
२०१६ १२९ ४६ ६२
२०१७ १५४ २५ ७८
२०१८ ८८ २१ ४२
एकूण ६३९ १६७ ३२८