आतापर्यंत किती जणांचे लचके तोडले? श्वानदंशाची माहिती पालिकेकडून गुलदस्त्यात
By जयंत होवाळ | Updated: December 16, 2024 13:49 IST2024-12-16T13:49:19+5:302024-12-16T13:49:31+5:30
पालिका हा सर्व तपशील दडवत आहे की काय, अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे.

आतापर्यंत किती जणांचे लचके तोडले? श्वानदंशाची माहिती पालिकेकडून गुलदस्त्यात
जयंत होवाळ, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: शहर आणि उपनगरांत कुत्र्यांच्या वाढत्या संख्येबरोबरच श्वान दंशाच्या घटना वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षांत किती जणांचा भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला, किती जणांना रेबीज झाला, त्या अनुषंगाने काय कार्यवाही केली, याची माहिती मुंबई महापालिकेचा आरोग्य विभागाकडे मागण्यात आली. मात्र, आरोग्य विभागाकडून त्या संदर्भात कोणतीही माहिती उपलब्ध झाली नाही. त्यामुळे पालिका हा सर्व तपशील दडवत आहे की काय, अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे.
२०१४ ते २०२३ या कालावधीत किती जणांना श्वान दंश झाला याचा तपशील 'लोकमत'ने पालिकेच्या आरोग्य विभागाकडे मागितला होता. आरोग्य विभागाच्या प्रमुख दक्षा शहा यांच्याशी अनेकदा संपर्क साधण्यात आला. आवश्यक माहिती मिळावी, असा संदेशही त्यांना पाठवला. मात्र, त्यांनी उत्तर देण्याचे किंवा माहिती किती कालावधीत दिली जाईल, याबाबत काहीच सांगितले नाही.
तीन वर्षांत ३,५०८ श्वान दंशाच्या घटना
अन्य सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २०२० ते २०२३ या कालावधीत ३,५०८ जणांना श्वान देश झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पाळीव कुत्र्यांच्या ४९ मालकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. परवान्यांचे नूतनीकरण करण्याबाबत या नोटिसा दिल्या गेल्याचे समजते. २०२० मध्ये श्वान देशाच्या ६१० घटना घडल्या होत्या. २०२३ मध्ये १,१२३ घटना घडल्या. गेल्या पाच वर्षांत रात्रीच्या वेळी कुत्र्यांना खायला घालण्याच्या संख्येत दुप्पट वाढ झाली आहे.