मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजित पवारांच्या नेतृत्त्वात महायुती सरकारमध्ये सहभागी होत सर्वांनाच राजकीय धक्का दिला. त्यानंतर, आपल्या प्रत्येक भाषणात अजित पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करताना पाहायला मिळत आहेत. मोदींसारखा दुसरा कणखर आणि करिश्मा असलेला दुसरा नेता देशात नाही. मोदींच्या नेतृत्त्वातच देश पुढे जातोय, विकास करतोय, आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवतोय, असे अजित पवार यांनी म्हटले. यावेळी, मोदींच्या स्वप्नातील ५ ट्रिलियन इकॉनॉमीचाही उल्लेख अजित पवारांकडून केला जात आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत एकीकडे इंडिया आघाडीची बैठक होत आहे. तर, दुसरीकडे एनडीए आणि महायुतीचीही बैठक सुरू आहे. या बैठकीत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा मोदींचं कौतुक केलं. तसेच, नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान बनवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करायचं आहे. मोदींचे हात बळकट करायचे आहेत, असे अजित पवार म्हणाले. यावेळी, ५ ट्रिलियन इकॉनॉमीचं स्वप्न मोदींनी पाहिलं आहे, त्यासाठी आपल्याला काम करायचंय. १ ट्रिलियन म्हणजे किती,? १ ट्रिलियन इकॉनॉमी म्हणजे ८२ लाख कोटी रुपये, ८२ ते साडे ८२ लाख कोटी रुपये म्हणजे १ ट्रिलियन असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. त्यानुसार, आपल्याला ५ ट्रिलियन इकॉनॉमीचा देश भारताला बनवायचा असल्याचंही ते म्हणाले.
अजित पवारांनी सांगितलेल्या गणितप्रमाणे ५ ट्रिलियन इकॉनॉमी म्हणजे ४१० ते ४१२ लाख कोटी रुपये म्हणजे ५ ट्रिलियन इकॉनॉमी होय. त्यामुळे, ५ ट्रिलियन इकॉनॉमी म्हणजे किती रुपये, असा प्रश्न पडलेल्या अनेकांच्या मनातील उत्तर अजित पवारांच्या भाषणातून मिळालंय, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
पुणे-पिंपरी चिंचवड राज्याबाहेर काढणार का
नुकतेच निती आयोगाचे मुंबईत बैठक घेऊन पुढील विकास आराखडा बनवणार असल्याचे सांगितले. त्यावरून संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड या नेत्यांनी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव आहे असा आरोप केला. या आरोपाचा महायुतीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला. जोपर्यंत चंद्र, सूर्य तारे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी कुणाचा बापही करू शकत नाही अशा शब्दात अजित पवारांनी आव्हाड-राऊत यांना फटकारले आहे.निती आयोगाने देशात ४ शहरे निवडली आहे. टप्प्याटप्प्याने त्या शहरात वाढ होईल. काहीही सांगायचे आणि दिशाभूल करायची. वाराणसी उत्तर प्रदेशातून, सुरत गुजरातमधून बाहेर काढायचे चालले आहे का? उद्या पुणे, पिंपरी चिंचवडचे नाव घेतले तर तेदेखील राज्यातून काढायचे असा आरोप करणार का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.