मुंबई - शिवसेना पक्षात मोठी बंडखोरी झाल्यानंतर एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री बनले. भाजपासोबत युती करुन शिंदे गटातील ४० आमदार आणि १३ खासदारांनी राज्यात महायुतीचं सरकार स्थापन केलं. त्यानंतर, शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे. तर, दुसरीकडे ठाकरे विरुद्ध भाजप आणि उद्धव ठाकरे विरुद्ध देवेंद्र फडणवीस यांच्यातही खडाजंगी पाहायला मिळत आहे. त्यातच, आता महापालिका निवडणुका जवळ आल्या असून लोकसभेची तयारीही भाजपने सुरू केली आहे. त्याच अनुषंगाने देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आला होता. शिंदे गटाला किती जागा देणार? त्यावर फडणवीसांनी स्पष्टच उत्तर दिलंय.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. दोन्ही नेते एकमेकांवर अमर्याद टीका करताना पाहायला मिळत आहेत. दुसरीकडे शिंदे आणि फडणवीसांची चांगलीच गट्टा जमल्याचं दोन्ही नेते दाखवून देत आहेत. तसेच, यापुढील महापालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी आपण युतीतच लढणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी घोषित केलं आहे. त्यामुळे, आता शिंदे गटाला किती जागा मिळणार, हा प्रश्न आहे. यापूर्वी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिंदेंच्या शिवसेनेला ५०-६० जागा देण्याचं विधान केलं होतं, त्यावरुन शिवसेना नेत्यांनी भाजपला सुनावलं. त्यामुळे, भाजपने एक पाऊल मागे घेतल्याचं पाहायला मिळालं. आता, देवेंद्र फडणवीसांनी या जागावाटपासंदर्भात पत्रकाराच्या प्रश्नावर उत्तर दिलंय.
शिंदेंच्या शिवसेनेला किती जागा देणार? असा प्रश्न फडणवीसांना रिपब्लिकच्या मुलाखतीत विचारण्यात आला होता. त्यावर, शिवसेना आणि भाजपची आमची जी सीट शेअरींग होती, त्याचप्रमाणे लोकसभेसाठी शेअरींग होईल. त्यांच्यासोबत जेवढे खासदार आले आहेत, त्या जागा त्यांनाच मिळतील. शिवसेना जेवढ्या जागा लढत होती, तिथे त्यांच्याकडे योग्य उमेदवार असल्यास त्या जागा त्यांनाच मिळतील. आम्ही ज्या जागा लढवत होतो, त्या जागांवर आम्हीच निवडणूक लढवणार, असं गणित फडणवीसांनी मांडलंय. तसेच, विधानसभेलाही जवळपास तसंच होईल, जास्त अपेक्षा ना आम्हाला आहेत, ना त्यांना, असेही फडणवीसांनी म्हटलंय.
उद्धव ठाकरे मुस्लिमांचे नवीन मसिहा
मुंबईत उद्धव ठाकरेंचा मताचा टक्का कमी झालाय, मराठी आणि नॉन मराठीमध्येही मतं कमी झाले आहेत. त्यामुळे, हा मतांचा टक्का भरुन काढण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मुस्लीम वोट बँक जवळ केलीय.उद्धव ठाकरेंकडून सध्या मुस्लिम वोट बँकेला जवळ करण्याचा प्रयत्न केला जातोय. उद्धव ठाकरेच आपल्यासाठी नवीन मसिहा असल्याचं त्यांना वाटतंय. म्हणूनच, आज समान नागरी कायद्यासंदर्भात चर्चेसाठी मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डच्या पदाधिकार ना शरद पवाराकडे गेले, ना अखिलेश यादवकडे गेले, ते थेट उद्धव ठाकरेंना भेटायला गेले, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.