मुंबई : मुंबईत वर्षभर विविध प्राधिकरणांकडून खोदकाम सुरूच असते. जमिनीखालून केबल टाकण्यासाठी काही महिन्यांपूर्वी तयार करण्यात आलेले रस्ते खोदले जातात व रस्त्याची वाताहत होते, असे होऊ नये यासाठी वीजपुरवठा, टेलिकॉम, इंटरनेट पुरविणाऱ्या कंपन्यांना खोदकामाची ब्लू प्रिंट सादर सादर करावी लागणार आहे. वर्षभरात किती खोदकाम करणार याचे वेळापत्रक कंपन्यांना जून, जुलैमध्ये पालिकेला सादर करावे लागणार आहे.
मुंबईतील रस्ते कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आले आहेत. त्यातच मुंबईतील रस्त्यांचे काँक्रिटीकरण पालिकेने हाती घेतले आहे. मात्र, जमिनीखालून तारा टाकण्यासाठी अनेकदा हे रस्ते खोदले जातात. त्यामुळे रस्त्यांची वाताहत होते व त्याचा त्रास नागरिकांना होतो. इतकेच नव्हे तर रस्त्यावर खर्च करण्यात आलेला निधी देखील वाया जातो. असे होऊ नये म्हणून पालिकेने धोरणात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबतचा मसुदा तयार करण्यात येत असून वीज कंपन्या, दूरसंचार, इंटरनेट पुरवठादार इत्यादी एजन्सींनी अटींचे पालन केले नाही तर ५ टक्के अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे तसेच, पादचाऱ्यांची गैरसोय पाहता कंपन्यांना रस्ता पूर्णपणे खोदता येणार नाही. याशिवाय एकावेळी ३०० मीटर लांबीचा रस्ता खोदता येईल. खोदकाम झाल्यावर तो रस्ता पुन्हा भरण्याची व मलबा साफ करण्याची जबाबदारी संबंधित कंपनीची असेल.
काँक्रीटचा रोड खोदण्यास परवानगी नाहीमुंबईत अनेक ठिकाणी काँक्रीटचे रस्ते बांधण्यात येत असून, हे रस्ते खोदकामासाठी वर्षभर तोडता येणार नाहीत. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास खोदकामासाठी पालिका आयुक्तांची परवानगी घेणे बंधनकारक असेल.