मोफत उपचार मिळतो; हातापाया किती पडायचे साहेब? लाभार्थ्याचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2023 12:14 PM2023-04-06T12:14:29+5:302023-04-06T12:14:40+5:30
काय आहे महात्मा फुले योजना? कुठली कागदपत्रे आवश्यक? जाणून घ्या...
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: सर्वसामान्यांना गंभीर आजारांवरील दर्जेदार उपचार पूर्णतः मोफत उपलब्ध करून देणे हा महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा मुख्य उद्देश आहे. राज्यात महात्मा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना एकत्रितपणे राबविल्या जातात. महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबाला वार्षिक १.५० लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळते.
काय आहे महात्मा फुले योजना?
या योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी नागरिकांकडे पिवळी शिधापत्रिका, अंत्योदय अन्न योजना, अन्नपूर्णा योजना व केशरी (रु. एक लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न) शिधापत्रिका असणे आवश्यक आहे.
शस्त्रक्रियांसह औषधोपचार मोफत
महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत लाभार्थी ३४ निवडक विशेष सेवेंतर्गत ९९६ प्रकारच्या गंभीर व खर्चिक शस्त्रक्रिया तसेच १२१ शस्त्रक्रियापश्चात सेवांचा लाभ घेऊ शकतात. या योजनेत कोरोनावरील उपचारांचाही समावेश करण्यात आला आहे.
अशी करा नोंदणी
महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णालयात आरोग्यमित्र असतात. योजनेमध्ये अंगीकृत असणाऱ्या सर्वच रुग्णालयांत हे उपलब्ध असतात. आरोग्यमित्र रुग्णांची ऑनलाइन नोंदणी करतात. ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरल्या जाणाऱ्या दस्तऐवजांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
कुठली कागदपत्रे आवश्यक?
महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत देण्यात आलेले आरोग्य ओळखपत्र, असंघटित कामगार ओळखपत्र, ही दोन्ही ओळखपत्रे नसतील तर शिधापत्रिका किंवा छायाचित्रासह असणारे कोणतेही ओळखपत्र उदा. आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, वाहनचालक परवाना, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबाची पांढरी शिधापत्रिका आणि सात-बारा उताराही या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामी येतो. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने निर्धारित केलेली योग्य ती ओळखपत्रे ग्राह्य धरली जातात.
३ महिन्यांत किती जणांवर केले उपचार?
मागील तीन महिन्यांत शहर, उपनगरांतील ५ हजार ५३२ रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.