शिवडी-वरळी उन्नत मार्गासाठी किती झाडांची कत्तल होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 01:09 AM2020-01-08T01:09:31+5:302020-01-08T01:09:38+5:30

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) शिवडी-वरळी या ४.५ किमीच्या उन्नत मार्गासाठी मंगळवारी जनसुनावणी घेण्यात आली.

How many trees will be slaughtered for the advanced route of Shivdi-Worli? | शिवडी-वरळी उन्नत मार्गासाठी किती झाडांची कत्तल होणार?

शिवडी-वरळी उन्नत मार्गासाठी किती झाडांची कत्तल होणार?

Next

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) शिवडी-वरळी या ४.५ किमीच्या उन्नत मार्गासाठी मंगळवारी जनसुनावणी घेण्यात आली. या जनसुनावणीवेळी या प्रकल्पाबाबत नागरिकांनी प्रश्न उपस्थित करत आपल्या शंका उपस्थित केल्या. या प्रश्नांना एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला.
वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) एमएमआरडीएच्या मुख्यालयामध्ये सकाळी अकरा वाजता ही जनसुनावणी घेण्यात आली. या सुनावणीपूर्वी प्राधिकरणातर्फे नागरिकांना सादरीकरणाद्वारे प्रकल्पाची माहिती देण्यात आली. या सुनावणीला पंधरा ते वीस नागरिकांची उपस्थिती होती. या सुनावणीदरम्यान आरे कन्झर्व्हेशन ग्रुप या पर्यावरणवादी संघटनेचे सदस्य झोरू बाथेना यांनी या मार्गिकेबाबत प्रश्न उपस्थित करत ही मार्गिका पूर्ण झाल्यावर वरळी येथून वरळी-वांद्रे सीलिंकद्वारे बीकेसीला कसे जाता येईल, याबाबत माहिती विचारली. कारण तेथे कोस्टल रोडही प्रस्तावित आहे. याबाबत महापालिकेसोबत काही समन्वय साधण्यात आला आहे का? असा प्रश्नही उपस्थित केला. यावर अद्याप आराखडा अंतिम झालेला नसून महापालिकेसोबत समन्वयाने यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे एमएमआरडीएच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. तसेच या मार्गिकेमुळे किती झाडे बाधित होत आहेत, असाही प्रश्न झोरू बाथेना यांनी उपस्थित केला असता त्यावर अद्याप किती झाडे बाधित होतील याबाबत निश्चित सांगता येणार नसल्याचेही प्राधिकरणातर्फे स्पष्ट करण्यात आले.
यासह सीआरझेडच्या अनुषंगाने काही प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले. तर शिवडी-वरळी या उन्नत मार्गिकेमुळे प्रस्तावित असलेला कोस्टल रोड कुठे आणि कसा असेल, शिवडी-वरळी उन्नत मार्गामध्ये काही बदल केल्याने कनेक्टिव्हीटी कशी असेल. तसेच हा उन्नत मार्ग परळमधील महत्त्वाच्या हॉस्पिटलला जोडणारा असेल का, असे अनेक प्रश्न नागरिकांनी यावेळी उपस्थित केले. तर मार्गिकेचा शिवडीकडचा भाग हा इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये (ईएसझेड) येतो का, असा प्रश्न कन्झर्वेशन अ‍ॅक्शन ट्रस्टतर्फे (सीएटी) यावेळी उपस्थित करण्यात आला. यावर एमएमआरडीएने नंतर उत्तर पाठवू, असे सांगितले.
शिवडी ते न्हावाशेवा अशा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पासाठी (एमटीएचएल) महत्त्वाचा असणारा शिवडी-वरळी उन्नत मार्गाचा अहवाल महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अ‍ॅथॉरिटीला (एमसीझेडएमए) एमएमआरडीएच्यावतीने सादर केला जाणार आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये एमएमआरडीएने एमसीझेडएमएकडे या प्रकल्पाची फाईल पाठविली होती. त्यावेळी शिवडी-वरळी कनेक्टर मार्गासाठी एमएमआरडीएने जनसुनावणी घेतली नसल्याचे निरीक्षण एमसीझेडएमने नोंदवत ही फाईल पुन्हा प्राधिकरणाकडे पाठवली होती.
>वाहतूक कोंडी प्रदूषण कमी होणार
या मार्गिकेमुळे येथील वाहतूक कोंडी फुटण्यासोबतच प्रदूषणही कमी होईल, असा दावा एमएमआरडीएने केला आहे. वांद्रेच्या दिशेला २०० मीटरचा रस्ता हा कोस्टल रेग्युलेशन झोन २ अंतर्गत येत आहे. हा मार्ग वांद्रे-वरळी सी-लिंक आणि भविष्यात तयार होत असलेल्या शिवडी-न्हावाशेवा या मार्गाला जोडणारा उन्नत मार्ग आहे. या मार्गामुळे पूर्व आणि पश्चिम प्रभाग जोडले जाणार असून, शिवडी-न्हावाशेवा मार्गाने नवी मुंबईत जाणे शक्य होणार आहे.

Web Title: How many trees will be slaughtered for the advanced route of Shivdi-Worli?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.