प्रविण मरगळे
मुंबई – गुजरात स्थित स्टर्लिंग बायोटेकद्वारा कोट्यवधी रुपयांच्या बँक घोटाळा प्रकरणात ईडीने काँग्रेस नेते अहमद पटेल यांची चौकशी सुरु केली आहे. आतापर्यंत तिनदा या प्रकरणात पटेल यांना ईडीच्या कार्यालयात जावं लागलं आहे. ईडीने २७ जून आणि ३० जूनला अहमद पटेल यांची पीएमएलए कायदा २००२ अंतर्गत काही तास चौकशी केली.
ईडीच्या सूत्रांनुसार वडोदरा स्थित फार्मास्युटिकल फर्मचे मालक आणि प्रमोटर्सचे संदेसरा ब्रदर्स(चेतन जयंतीलाल संदेसरा, नितीन संदेसरा) यांच्यासोबत अहमद पटेल यांचे संबंध जाणून घ्यायचे आहेत. मागील वर्षी या प्रकरणात अहमद पटेल यांचे चिरंजीव फैसल पटेल यांची चौकशी करण्यात आली. मात्र आता या प्रकरणात काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी नवीन ट्विस्ट समोर आणला आहे. स्टर्लिंग बायोटेक संदर्भात दिल्लीतील चौकशी संपली असेल तर ईडीने मुंबईकडे लक्ष केंद्रीत करावं. स्टर्लिंग बायोटेकचे संचालक राजभूषण दीक्षित आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या मालमत्ता व्यवहारातून अनेक प्रश्नांची उत्तरे ईडीला सापडू शकतात. राजभूषण दीक्षित यांना १० हजार स्क्वेअर फूट मातोश्री २ साठी केवळ ५.८ कोटी रुपये मिळाले, बीकेसीसारख्या परिसरात ही जागा आहे. मुंबईच्या बाजारभावापेक्षा अत्यंत कमी मूल्य या संपत्तीच्या खरेदीत झालं. यात चेक पेमेंटशिवाय मोठ्या प्रमाणात रोखीने व्यवहार करण्यात आल्याचा दावा संजय निरुपम यांनी केला आहे.
तसेच सध्या राजभूषण दीक्षित हे अटकेत आहेत. ईडीने आपल्या चौकशीत राजभूषण दीक्षित आणि त्यांचा भाऊ यांच्यासोबत झालेल्या व्यवहारांचीही चौकशी करावी. मालमत्ता व्यवहाराच्या चौकशीचीही गरज आहे अशी मागणी काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी करत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संशयांच्या जाळ्यात ओढलं आहे. ऑक्टोबर २०१६ मध्ये उद्धव ठाकरेंनी कलानगर परिसरात मातोश्री २ साठी जमीन खरेदी केली होती. त्यावरुन संजय निरुपम यांनी या व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी संजय निरुपम यांनी लोकमतशी बोलताना केली आहे.
मातोश्री २ जागा खरेदी प्रकरण काय आहे?
वांद्रे कलानगर परिसरात कलाकार के के हेब्बर राहत होते, १९९६ मध्ये हेब्बर यांच्या निधनानंतर ही जागा पत्नीच्या नावावर झाली. ती वारसा हक्काने मुलांकडे आली. २००७ मध्ये हेब्बर यांच्या मुलांनी मालाड येथील प्लॅनेटियम इन्फ्रास्ट्रक्चरला ही जागा ३.५ कोटींमध्ये विकली. त्यानंतर प्लॅनेटियमचे मालक राजभूषण आणि जगभूषण दीक्षित यांनी या जागी ८ मजल्यांची इमारत बांधण्याची परवानी घेतली होती. मात्र कालांतराने ही जमीन ठाकरे कुटुंबीयांनी ५.८ कोटींना प्लॅनेटियम कंपनीकडून विकत घेतली होती.
काय आहे स्टर्लिंग बायोटेक प्रकरण?
संदेसरा ब्रदर्स चेतन आणि नितीन यांनी गुजरात स्थित स्टर्लिंग बायोटेक लिमिटेडद्वारे बँकांसोबत जवळपास १४ हजार ५०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे त्यानंतर हे दोघं देश सोडून पळून गेले. व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीकोनातून संदेसरा बंधुंनी स्टर्लिंग बायोटेकच्या नावावर ५ हजार ३८३ कोटींचे कर्ज घेतले. हे कर्ज आंध्रा बँकेच्या माध्यमातून घेतले गेले, पण जाणुनबुजून त्याची परतफेड करण्यात आली नाही. बँकांनी २०१७ मध्ये फार्मा कंपनीचे प्रमोटर नितीन, चेतन आणि दिप्ती संदेसरा यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. ईडीच्या चौकशीत स्टर्लिंग बायोटेकने बँकाकडून कर्ज घेण्यासाठी आपल्या प्रमुख कंपन्यांच्या बँलेन्स शीटच्या आकड्यात फेरफार केल्याचं उघड झालं होतं.