मुंबई - आगामी महापालिका निवडणुकांसाठी सत्ताधारी भाजपने मुंबईत कंबर कसली आहे. मात्र, दुसरीकडे शिवसेनेतील बंडखोरीनंतर ठाकरे गटातील प्रमुख नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यात, आमदार आदित्य ठाकरे भाजप आणि बंडखोर आमदारांवर सातत्याने बोचरी टीका करतात. तसेच, विविध मुद्द्यांवरुन राज्य सरकार भ्रष्टाचारी असल्याचा दावा करतानाही ते दिसून येतात. आता, पेंग्विनच्या मुद्द्यावरुन पलटवार करताना आदित्य यांनी थेट मोदींकडेच बोट दाखवलं आहे. मोदींनी आणललेल्या चित्त्यांचा हिशोबही त्यांनी मागितला. त्यावरुन, आता मुंबई भाजपचे अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांनी उत्तर दिलंय.
मुंबई महापालिकेत मोठा भ्रष्टाचार होत असल्याचं आदित्य यांनी पत्रकार परिषदा घेऊन सांगितलं होतं. त्यानंतर, एका कार्यक्रमात पुन्हा एकदा त्यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकार हे १०० टक्के भ्रष्टाचारी असल्याचा आरोप केला. तसेच, पेंग्विन नावावरुन खिल्ली उडवल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना थेट मोदींनी आणणलेल्या चित्त्यांचाच हिशोब आदित्य ठाकरेंनी मागितला. त्यावर, आशिष शेलार यांनी त्यांची खिल्ली उडवत कटकमिशन घेतल्याचा आरोप लगावला आहे.
मुंबईतील नालेसफाई, रस्ते, डांबर, बेस्ट बस, पालिका शाळेतील मुलांच्या वह्या, कपडे आणि कोविडमध्ये बॉडी बॅग अशा प्रत्येक कंत्राटातील "कटकमिशन"चा हिशेब कंत्राटदारांकडून घ्यायची सवय ज्यांना वर्षानुवर्षे लागली होती. त्यांनी आता पेग्विन सारख्या मुक्या पक्षांचा पण हिशेब मारायला सुरुवात केली आहे. पेग्विन मुळे 50 खोके मिळाले आणि चित्यांमुळे किती? असा प्रश्न शेलार यांनी विचारला.
तुम्ही पेग्विन आणताना, त्यांचे खास घर बांधताना, देखभाल करताना, कंत्राटदारांकडून किती कटकमिशन घेतले? याचा हिशेब पण द्या ना आधी.तुमच्या खासदार, आमदार, नगरसेवकांनी तुमचा हिशेब केलाच आहे ना?चला आता बाकी उरलासुरला तुमचा "हिशेब" मुंबईकर निवडणुकीत चोख करतीलच!, असे म्हणत शेलार यांनी आदित्य ठाकरेंवर पलटवार केला.
काय म्हणाले होते आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरेंनी मुंबईतील इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये राज्यातील विविध घडामोडींसह देशातील आणि राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. तसेच, अनेक प्रश्नांना उत्तरे देत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही लक्ष्य केलं. या दरम्यान, आदित्य ठाकरेंची विरोधकांकडून बेबी पेंग्विन म्हणत खिल्ली उडवली जाते, यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावरही त्यांनी जोरकसपणे उत्तर दिले. आदित्य ठाकरे म्हणाले की, आम्ही पेंग्विन आणल्यामुळे बृहन्मुंबई महापालिकेला ५० कोटी मिळाले आहेत. “आम्हाला प्राणीसंग्रहालयात बरेच प्राणी मिळाले. आज किमान ३० हजार लोक प्राणीसंग्रहालयाला भेट देत आहेत. त्यातून, महापालिकेला उत्पन्न सुरू झालं. मात्र, देशात आणलेल्या चित्त्यांचे काय झाले, आधी ते पहा,” असे म्हणत विरोधक भाजपा नेत्यांना आदित्य ठाकरेंनी आरसा दाखवण्याचं काम केलं.