पाळलेल्या टॉमीचा खर्च किती?; लाडाने होतोय सांभाळ, खाद्यपदार्थही महागडे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 12:40 PM2023-09-26T12:40:32+5:302023-09-26T12:40:46+5:30
घरातील सदस्यांप्रमाणे करतात सांभाळ, खाद्यपदार्थही महागडे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या काही वर्षात शहरात कुत्रा पाळण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे या कुत्र्यांचा सांभाळ घरातील एक सदस्याप्रमाणे केला जातो. त्यांच्यासाठी लागणारे वेगळे जेवण त्यांना नियमितपणे केले जाते. तसेच त्यांना लागणारी खेळणी, त्यांना लागणारे तयार खाद्यपदार्थ हे सुद्धा दिवसभरात त्यांना दिले जाते. या खाद्यपदार्थांच्या विविध कंपन्या आहेत. त्याचे दर तसे महागडे असून त्यांना वर्षभर लागणारे औषधपाणी या सगळया गोष्टीत कुत्र्याचे मालक करत असतात. त्यामुळे एका कुत्र्याचा महिन्याचा सरासरी खर्च किमान १० ते १२ हजाराच्या घरात असतो.
हा खर्च वेगवेगळा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र कुत्र्यांवर खर्च करणारे अनेक जण शहरात आहेत. काही व्यक्ती तर आपल्या घरातील सदस्यांपेक्षा अधिक खर्च या कुत्र्यांवर करतात.
शहरात विविध जातींचे कुत्रे पाळले जातात. त्यामध्ये प्रामुख्याने लॅब्राडोर, डल्मॅटियन, पग, डॉबरमन पाळले जातात. त्यामध्ये डॉबरमन हा हुशार, सतर्क आणि दृढ निष्ठावान आहे; त्याला रक्षक कुत्रा किंवा साथीदार प्राणी म्हणून ठेवले जाते. त्याचप्रमाणे डल्मॅटियन ही कुत्र्यांची एक जात आहे. त्याच्यावर काळा किंवा तपकिरी-रंगाचे ठिपके असतात. केनेल क्लब स्पर्धांमध्ये डॅल्मॅटियन्स हे सहभाग घेत असतात. यामध्ये उत्कृष्ट सहनशक्ती आणि तग धरण्याची क्षमता आहे.
पग हा कुत्रा मध्यंतरीच्या काळात अगदी घरोघरी पाळला जात होता. मोबाइल सेवा पुरविणाऱ्या कंपनीच्या जाहिरातीत हा कुत्रा होता.
मात्र या जातीच्या कुत्र्यांमध्ये आरोग्याच्या समस्या उद्भवण्याचे इतर कुत्र्यांपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आहे. या कुत्र्याची खासियत अशी असते की याची कवटी लहान असते मात्र इतर अवयव त्या तुलनेत मोठेच आहेत. लॅब्राडॉर रिट्रीव्हर या जातीचा कुत्रा मैत्रीपूर्ण, उत्साही आणि खेळकर म्हणून ओळखला जातो. विशेष म्हणजे अनेक ठिकणी या जातीचा कुत्रा पाळला जातो. दरम्यान, अनेकांच्या घरी एकापेक्षा अधिकही श्वान असल्याचे आढळून आले आहे.