किती वापरली अतिरिक्त वीज? ग्राहकांना कळणार; कंपन्यांचा पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 03:18 AM2020-06-28T03:18:17+5:302020-06-28T03:18:30+5:30
पंखा, दिवे, रेफ्रिजरेटर, टीव्ही, एसीचा वापर समजणार
मुंबई : जून महिन्यात आलेल्या वीज बिलांनी ग्राहकांना घाम फोडला आहे. बिल जास्त येत असल्याच्या त्यांच्या तक्रारी आहेत. याच्या निरसनासाठी महावितरण, टाटा, अदानी या वीज कंपन्या आपआपल्या परीने कामाला लागल्या आहेत. लॉकडाऊनमध्ये ग्राहकांनी घरगुती उपकरणांवर किती अतिरिक्त वीज खर्च केली, याची माहिती त्यांना मिळण्याची व्यवस्था केली आहे.
लॉकडाऊनमध्ये ग्राहकांनी घरगुती उपकरणांवर किती अतिरिक्त वीज खर्च केली, याची माहिती त्यांना टाटा पॉवरच्या संकेतस्थळावर मिळेल. त्यासंदर्भातील तक्त्यात पंखा, दिवे, रेफ्रिजरेटर, टीव्ही, वॉशिंग मशीन, एसी यांचा उल्लेख आहे. आपल्या घरात यापैकी कोणती उपकरणे आहेत व आपण ती किती अतिरिक्त तास वापरली याचे आकडे ग्राहकाने या तक्त्यात भरायचे आहेत. त्यावरून किती वीज दररोज वापरली, याचा अंदाज ग्राहकाला मिळू शकेल. बिल आकारणीबाबत ग्राहकांना काही शंका असल्यास, त्यांनी २४ तास उपलब्ध असणाऱ्या १९१२३ या हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करावा. ग्राहक सहाय्य केंद्राला भेट द्यावी, असे आवाहनही कंपनीने केले.
तर, अदानी इलेक्ट्रिसिटीकडून प्राप्त माहितीनुसार, मीटर रीडिंग घेण्याचे काम सुरू झाले आहे. मार्च, एप्रिल, मे महिन्यात ग्राहकांना जी बिले पाठविली ती डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी महिन्याच्या सरासरी वीज बिलानुसार होती. एप्रिल आणि मे महिन्यांत बहुतांश ठिकाणी ‘वर्क फ्रॉम होम’ झाले. शिवाय उन्हाळा होता. परिणामी विजेच्या मागणीत वाढ झाली. मात्र तेव्हाची बिले ही रीडिंगनुसार नव्हती, तर गेल्या तीन महिन्यांतील म्हणजे डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीतील बिलांच्या सरासरीवर काढली होती. त्यामुळे ती कमी आली. मात्र आता रीडिंग सुरू झाले असून त्यानुसार पुढील वीज बिले ग्राहकांना येत आहेत. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यातील फरक जूनच्या बिलात येत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही बिले ग्राहकांना व्याजासह हप्त्यानेही भरता येतील.
ग्राहकांसाठी तक्रार निवारण कक्ष
महावितरणच्या राज्यभरातील सर्व कार्यालयांमध्ये ग्राहक तक्रार निवारण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. महावितरणमधील तांत्रिक, लेखा, वित्त, आणि माहिती तंत्रज्ञान विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे वेगवेगळे गट तयार करून हे कक्ष सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये जून महिन्याच्या बिलाची आकारणी सांगण्यात येईल तसेच ग्राहकांच्या तक्रारी व शंका दूर करण्यात येतील.