कोरोना कॉलर ट्यूनसाठी 'बिग बिं'ना किती मानधन? सरकार म्हणतंय...
By महेश गलांडे | Published: January 25, 2021 10:05 AM2021-01-25T10:05:35+5:302021-01-25T10:06:10+5:30
'कोव्हिड १९ अभी खत्म नहीं हुआ है... इसलिए जब तक दवाई नहीं तब तक ढिलाई नहीं', या अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कॉलर ट्यूनने मोबाईल युजर्सं वैतागल होते.
मुंबई - 'बिग बी' अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील 'कोरोना'बद्दल जगजागृती करणारी आणि नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करणारी कॉलर ट्यून आता बंद करण्यात आली आहे. अमिताभ यांची कॉलर ट्यून बंद झाल्यानंतर आता 15 जानेवारीपासून लसीकरणाची नवीन ट्यून सुरू करण्यात आली आहे. मात्र, अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कॉलर ट्यूनसाठी त्यांना किती रुपये मानधन देण्यात आले, याबाबत सरकारकडे माहितीच उपलब्ध नाही. माहिती अधिकारातून ही माहिती समोर आली आहे.
'कोव्हिड १९ अभी खत्म नहीं हुआ है... इसलिए जब तक दवाई नहीं तब तक ढिलाई नहीं', या अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कॉलर ट्यूनने मोबाईल युजर्सं वैतागल होते. सोशल मीडियावर करोना व्हायरसच्या कॉलर ट्यूनवरून अनेक जणांनी जोक, मिम्स बनवले होते. तर, कित्येकांनी आता ही कॉलरट्यून बंद करा, म्हणून मोबाईल सीम कंपन्यांकडे तक्रारही केली होती. विशेष म्हणजो कोरोना व्हायरसची कॉलर ट्यून बंद करण्यासाठी काही जणांनी कोर्टात याचिकाही दाखल केल्या होत्या.
आता माहिती अधिकार कार्यकर्ते अॅड. प्रणय अजमेरा यांनी अमिताभ बच्चन यांना या कॉलर ट्यूनसाठी किती मानधन दिले होते, यासंदर्भात माहिती मागवली होती. मात्र, यासंदर्भातील माहिती आपल्याकडे उपलब्ध नसल्याचे माहिती व प्रसारण मंत्रालयाने उत्तरादाखल दिलेल्या पत्रात म्हटले आहे. तसेच, याबाबतच्या कराराचीही माहिती नसल्याचे मंत्रालयाने कळवले आहे, त्यामुळे या कॉलर ट्यूनच्या खर्चाबाबत संभ्रम निर्माण होत आहे. यापूर्वीही केंद्र सरकारने कोविड 19 संदर्भातील आरोग्य सेतू अॅपच्या खर्चाबद्दल माहिती उपलब्ध नसल्याचे सांगितले होते. दरम्यान, आता ही कॉलर ट्यून बंद करण्यात आली आहे.
नेतेमंडळींची कॉलर ट्यूनला वैतागली
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कॉलर ट्यून काढण्याची मागणी केली होती. या कॉलर ट्यूनमुळं भीती पसरवली जात असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. तर राजस्थानचे काँग्रेसचे आमदार भरत सिंह यांनीही या कॉलर ट्यूनला आक्षेप घेतला होता. भरत सिंह यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून फोनमध्ये ऐकू येणारी करोना विषाणूबाबत जनजागृती करणारी कॉलर ट्यून बंद करण्याची विनंती केली होती.