कोरोनाचा राखीव बेड कितीला? खासगी रुग्णालयांचा सवाल

By संतोष आंधळे | Published: April 3, 2023 08:45 AM2023-04-03T08:45:43+5:302023-04-03T08:46:53+5:30

सरकारकडून स्पष्टता नाही!

How much is the reserve bed of Corona? Question of private hospitals | कोरोनाचा राखीव बेड कितीला? खासगी रुग्णालयांचा सवाल

कोरोनाचा राखीव बेड कितीला? खासगी रुग्णालयांचा सवाल

googlenewsNext

संतोष आंधळे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: गेल्या महिनाभरात मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने पुन्हा एकदा या अनुषंगाने जोरदार तयारी करण्यास सुरुवात केली आहे. सर्व रुग्णालयांना सूचना देण्यापासून ते काही रुग्णालये या आजारासाठी राखीव ठेवण्यापर्यंत, जम्बो कोविड सेंटर उभारण्याचे नियोजन केले गेले आहे. यामध्ये अधिकची भर म्हणजे मुंबईतील सर्व मोठ्या खासगी रुग्णालयांनाही बेड राखीव ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. या संदर्भात शुक्रवारी बैठक झाली. दरम्यान, या कोरोनाच्या रुग्णांसाठी किती शुल्क आकारावे याबाबत मात्र सरकारकडून कोणतीही स्पष्टता आलेली नाही.

मागच्या कोरोनाच्या काळात मुंबई हॉटस्पॉट होती. संपूर्ण देशात सर्वाधिक रुग्ण मुंबईत होते. देशातील सर्व आरोग्य यंत्रणेचे लक्ष मुंबईच्या ‘आरोग्या’कडे  होते.  विशेष म्हणजे, त्या काळात कोरोना रुग्णांसाठी किती शुल्क आकारावे, हे आरोग्य विभागाने स्पष्ट केले होते. मात्र, आता पुन्हा कोरोनाचे रुग्ण खासगी रुग्णालयात जाण्यास सुरुवात झाल्याने त्यांच्यासाठी किती शुल्क आकारावे, हे मात्र स्पष्ट केलेले नाही. गेल्या काही दिवसांत मुंबईतील रुग्णांची संख्या वाढत आहे. रविवारी महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १७२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १२ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. तर चार रुग्णांना ऑक्सिजन बेड्सची गरज भासली आहे. शहरात सध्याच्या घडीला कोरोनाचे १०७० सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी १९ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. तर पाच रुग्णांना ऑक्सिजन बेड्सची गरज भासली आहे. शहरात सध्याच्या घडीला कोरोनाचे १, ०२१ सक्रिय रुग्ण आहेत. तर दिवसाला हजारापेक्षा अधिक चाचण्या होत आहेत.

आमची दोन दिवसांपूर्वीच  खासगी रुग्णालयांच्या प्रशासकाची बैठक झाली.  यात सर्व रुग्णालयांना काही  बेड कोरोनाबाधित रुग्णांसाठी आरक्षित ठेवण्याच्या सूचना दिल्या. सध्याची परिस्थिती पाहता कुणी चार, कुणी सहा,  तर कुणी १० बेड राखीव ठेवण्याची तयारी दर्शविली आहे. गरज लागेल तेव्हा अधिक बेड राखीव ठेवण्यावर एकमत झाले. ही बैठक ऑनलाइन झाली. त्यात २३ रुग्णालयाच्या व्यवस्थापनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये १३ बेड राखीव ठेवले आहेत. हिरानंदानी रुग्णालयात दाेन रुग्ण दाखल आहेत. बेडचे शुल्क किती असावे, याबाबत सरकारने स्पष्टता केलेली नाही. अशी माहिती गौतम भन्साळी, मुख्य समन्वयक, कोरोना टास्क फोर्स यांनी दिली.

सध्या रुग्ण कुठे उपचार घेत आहेत?

- सेवन हिल्स रुग्णालय , कस्तुरबा रुग्णालय, सेंट जॉर्जेस रुग्णालय  
- ३३ खासगी रुग्णालयांनी दाखविली आरक्षित बेड ठेवण्याची तयारी.

  • एक दिवसाला जनरल बेड रुपये ४,०००
  • अतिदक्षता विभागासाठी दिवसाला रुपये ७,०००
  • व्हेंटिलेवरवर रुग्ण असेल तर रुपये ९,०००

-  यामध्ये डॉक्टरांचे सर्व चार्जेस समाविष्ट होते. या व्यतिरिक्त कुठल्याही खासगी रुणालयांनी पैसे आकारू नये. या दरानेच पैसे घ्यावेत, असे आरोग्य विभागाने सांगितले होते.

आम्हाला या संदर्भातील सूचना आल्या आहेत. त्याप्रमाणे आम्ही आमची तयारी करत आहोत. मात्र, त्याकरिता किती शुल्क आकारावे याबाबत कोणतीही माहिती सध्या उपलब्ध नाही. मात्र, सरकार सुचवेल त्याप्रमाणे आमची शुल्क घेण्याची तयारी आहे. -डॉ. विवेक तळवळीकर, मुख्य प्रशासकीय अधिकारी, ग्लोबल रुग्णालय

आमच्या रुग्णालयात २४ बेड राखीव आहेत. सहा बेडवर कोरोनाचे रुग्ण उपचार घेत आहेत. शुल्क कसे आणि किती आकारावे याबाबत अजून काही सूचना नाही. ज्या ठिकाणी बेड राखीव आहे तो आमचा जनरल वॉर्ड आहे. त्याप्रमाणे आम्ही सध्या शुल्क घेत आहोत. जर सरकारने शुल्काच्या बाबतीत मार्गदर्शक सूचना केल्या तर आम्ही त्याचे पालन करू.  -डॉ. जॉय चक्रवर्ती, मुख्य प्रशासकीय अधिकारी, पी. डी. हिंदूजा रुग्णालय

Web Title: How much is the reserve bed of Corona? Question of private hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.