मुंबई
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीचं मतदान आज होत आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मतदानाचा हक्क बजावला. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी भाजपा आणि मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपानं खरंतर गुजरात निवडणूक कोणत्याही प्रचाराविना जिंकायला हवी. पण खुद्द पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना गुजरातमध्ये प्रचारासाठी ठाण मांडून बसावं लागलं आहे. त्यामुळे निकाल काय लागेल सांगू शकत नाही, असं संजय राऊत म्हणाले. तसंच मशीनमध्ये गडबड करुन करुन किती गडबड करणार, लोकांचा आता निवडणूक यंत्रणेवर विश्वास राहिलेला नाही, असं मोठं विधान संजय राऊत यांनी यावेळी केलं. ते प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
"दोन महिन्यांपासून मी पाहातोय. गुजरातमध्ये पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा प्रचार करत आहेत. पंतप्रधान आपला पूर्णवेळ गुजरातमध्ये प्रचारासाठी देत आहेत. गुजरातमध्ये तीन टर्म भाजपाची सत्ता असतानाही प्रचारासाठी पंतप्रधानांना का यावं लागत आहे? गुजरात तुम्ही बनवलाय असं म्हणता तरी आजही तुम्हाला प्रचाराला उतरावं लागतं. खरंतर कोणत्याही प्रचाराविना तुम्ही निवडणूक जिंकायला हवी. पण तशी परिस्थिती नाही याची कल्पना तुम्हाला आहे. त्यामुळेच प्रचारासाठी इतका घाम गाळावा लागतोय", असं संजय राऊत म्हणाले.
शिंदे-फडणवीस सरकार लाचारमहाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावर बोलत असताना संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकार लाचार असल्याचं म्हटलं. कर्नाटकचा मुख्यमंत्री महाराष्ट्राला आव्हान देतो, तरी तुम्ही तोंड बंद करुन बसला आहात. हे लोक फक्त लाचार आहेत यांच्यात कर्नाटकला उत्तर देण्याची हिंमत नाही. तुमच्या घरात ते घुसले आहेत आणि हिंमत असेल तर कर्नाटकला उत्तर द्या, असंही संजय राऊत म्हणाले. राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराजे देसाई बेळगाव दौऱ्यावर जाणार होते. पण दौरा रद्द होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याही मुद्दयावरुन संजय राऊत यांनी निशाणा साधला. "चंद्रकांत पाटील आणि शंभुराजे देसाई यांच्यात हिंमत असेल तर कर्नाटकच्या सीमेला स्पर्श तरी करुन दाखवावा. शेपट्या मागे घालून बसण्यात काहीच अर्थ नाही", असं संजय राऊत म्हणाले.