महागाई अजून किती रडविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:05 AM2021-02-10T04:05:47+5:302021-02-10T04:05:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनामुळे ओढवलेल्या संकटजन्य परिस्थितीला सामान्य जनता त्रासलेली असतानाच आता नागरिकांना महागाईची मोठ्या प्रमाणात झळ ...

How much more inflation will cry | महागाई अजून किती रडविणार

महागाई अजून किती रडविणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनामुळे ओढवलेल्या संकटजन्य परिस्थितीला सामान्य जनता त्रासलेली असतानाच आता नागरिकांना महागाईची मोठ्या प्रमाणात झळ बसलेली आहे. मागील चार महिन्यात पेट्रोल, डिझेल व गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्याने नेमका घरखर्च चालवावा कसा, असा प्रश्न सर्वसामान्यांसमोर उभा ठाकला आहे. मागील वर्षभरात कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर अनेकांच्या उद्योगधंद्यांवर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील आर्थिक गणितेदेखील बिघडली आहेत. त्यातच मागील काही महिन्यांपासून वीज कंपन्या वाढीव वीज बिल आकारत आहेत. यामुळे सर्वसामान्यांचे संपूर्ण महिन्याचे बजेट कोलमडले आहे.

पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये मागील चार महिन्यांपासून झालेल्या वाढीमुळे आता वाहतुकीचा खर्चदेखील वाढला आहे. त्याचा थेट परिणाम बाजारातील सर्व वस्तूंच्या दरांवर होत आहे. फळे, भाज्या, मासळी बाजार, कपडे अशा सर्वांच्या किमती यामुळे वाढलेल्या आहेत. तसेच घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतींमध्येदेखील तब्बल १२५ रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे गृहिणींना चिंता सतावू लागली आहे. महागाई अजून किती रडविणार आणि प्रशासन ही महागाई कमी करण्यासाठी काही पावले उचलणार आहे का, असा सवाल सर्वसामान्य उपस्थित होत आहे.

दरवाढीमुळे त्रस्त

संतोष गीते -

कंपनीने कोरोनामुळे पगारात कपात केली आहे. त्यात शासनाने पेट्रोल डिझेलचे भाव वाढविल्यामुळे बाइकमधील पेट्रोलचा खर्च परवडत नाही. ज्यावेळी मी बाइक खरेदी केली त्यावेळेस पेट्रोलचा दर ६० रुपये लीटर होता. मात्र आता पेट्रोल ९० च्या पलीकडे गेल्याने गाडी विकण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

योगेश माळी -

आपल्या शेजारील देश पेट्रोल आपल्याकडून विकत घेतात. मात्र त्या देशांमधील पेट्रोलचे दर आपल्याहून कमी आहेत. केंद्र सरकार व राज्य सरकार पेट्रोलवर वाढीव कर लावून सामान्यांची पिळवणूक करीत आहे. हे कर कमी करून शासनाने पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी कराव्यात.

अनिता पाटील -

आधीच मागील काही महिन्यांपासून वाढीव वीज बिल येत आहे. त्यात सिलिंडरच्या किमती दर महिन्याला वाढत आहेत. यामुळे घर खर्च चालविणे कठीण होऊन बसले आहे. सरकारने सामान्य माणसाची पिळवणूक थांबवायला हवी.

अशी आहे इंधन दरवाढ

पेट्रोल प्रतिलीटर

१ नोव्हेंबर - ८७.७४

१ डिसेंबर - ८९.०२

१ जानेवारी - ९०.३०

१ फेब्रुवारी - ९३. ४९

डिझेल प्रतिलीटर

१ नोव्हेंबर - ७६.८६

१ डिसेंबर - ७८.९७

१ जानेवारी - ८०.५१

१ फेब्रुवारी - ८३.९१

सिलिंडरचे भाव

१ नोव्हेंबर - ५९४

१ डिसेंबर - ६४४

१ जानेवारी - ६९४

१ फेब्रुवारी - ७१९

Web Title: How much more inflation will cry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.