लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईतल्या खड्ड्यांमुळे अंधेरी येथील प्रकाश भिलारे यांचा मृत्यू झाला होता. या घटनेला वर्ष उलटल्यानंतरही त्यांचे कुटुंब नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे अशा प्रकरणांत हलगर्जी करणारी महापालिका आणखी किती प्रकाश भिलारेंचा जीव घेणार, असा सवाल वॉचडॉग फाउंडेशनने केला आहे.गेल्या वर्षी २८ जुलै रोजी दादाराव भिलोरे यांचा मुलगा प्रकाश कॉलेजमधून परतत होता. त्या वेळी जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील खड्ड्यामुळे त्याचा अपघात झाला. यात १६ वर्षीय प्रकाशचा मृत्यू झाला. तेव्हापासून त्याच्या वडिलांनी रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले. मात्र मुलाच्या मृत्यूचे दु:ख हे कुटुंब पचवू शकले नाही. परिणामी, किमान या कुटुंबाला न्याय आणि नुकसानभरपाई मिळावी याकरिता वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त निकोलस अल्मेडा आणि गॉडफ्रे पिमेंटा यांनी लोक आयुक्त कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला. रस्त्यावरील खड्ड्यामुळे जीव गेलेल्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई द्यावी, असे पत्र अल्मेडा आणि पिमेंटा यांनी लोक आयुक्तांना पाठवले.लोक आयुक्तांनी यावर पत्राला उत्तरही दिले. त्यानुसार, रस्त्यावरील खड्ड्यामुळे जीव गमवावा लागलेल्या / जखमी झालेल्या लोकांना नुकसानभरपाई देण्याची बाब शासनाच्या / महापालिकेच्या धोरणात्मक बाबीशी निगडित ठरते. महाराष्ट्र लोक आयुक्त आणि उपलोक आयुक्त अधिनियम १९७१चे कलम ८(६)मधील तरतुदीनुसार अशा प्रकरणात या कार्यालयास चौकशी करता येत नाही. त्यांनी त्यांच्या गाऱ्हाण्याबाबत अधिकाऱ्याकडे दाद मागावी, असे नमूद केले. महापालिकेने आता तरी भिलोरे कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याबाबत कार्यवाही करावी, असे गॉडफ्रे पिमेंटा यांचे म्हणणे आहे.रस्त्यावरील खड्ड्यामुळे जीव गमावलेल्या / जखमी झालेल्यांना नुकसानभरपाई देण्याप्रकरणी कार्यवाही करून तसे तक्रारदारांना तीस दिवसांत कळवावे, असे निर्देश लोक आयुक्त कार्यालयाने महापालिकेला दिले होते. मात्र सहा महिने उलटून गेले तरी काहीच हालचाल झालेली नाही, अशी माहिती ‘वॉचडॉग’ने दिली.निर्देशांची अंमलबजावणी करामहापालिका आयुक्त अजय मेहता यांनी यापूर्वी झालेल्या आठवडा बैठकीत सहायक आयुक्तांनी आपआपल्या विभागातील रस्ते कामांचा आढावा घ्यावा, असे निर्देश दिले होते. सध्याची रस्त्यांची स्थिती पाहता के/ईस्टच्या सहायक आयुक्तांनीही महापालिका आयुक्तांच्या निर्देशाची अंमलबजावणी करत विभागातील रस्ते सुस्थितीत करावेत, असे ‘वॉचडॉग’चे म्हणणे आहे.
आणखी किती प्रकाश भिलोरेंचा जीव घेणार?
By admin | Published: May 24, 2017 3:10 AM