महागाई अजून किती रडविणार ?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 02:32 AM2021-02-10T02:32:02+5:302021-02-10T02:32:28+5:30
चार महिन्यांत पेट्रोल-डिझेल ८, तर सिलिंडर १२५ रुपयांनी महागले
मुंबई : कोरोनामुळे ओढवलेल्या संकटजन्य परिस्थितीला सामान्य जनता त्रासलेली असतानाच आता नागरिकांना महागाईची मोठ्या प्रमाणात झळ बसलेली आहे. मागील चार महिन्यात पेट्रोल, डिझेल व गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्याने नेमका घरखर्च चालवावा कसा, असा प्रश्न सर्वसामान्यांसमोर उभा ठाकला आहे. मागील वर्षभरात कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर अनेकांच्या उद्योगधंद्यांवर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील आर्थिक गणितेदेखील बिघडली आहेत. त्यातच मागील काही महिन्यांपासून वीज कंपन्या वाढीव वीज बिल आकारत आहेत. यामुळे सर्वसामान्यांचे संपूर्ण महिन्याचे बजेट कोलमडले आहे.
पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये मागील चार महिन्यांपासून झालेल्या वाढीमुळे आता वाहतुकीचा खर्चदेखील वाढला आहे. त्याचा थेट परिणाम बाजारातील सर्व वस्तूंच्या दरांवर होत आहे. फळे, भाज्या, मासळी बाजार, कपडे अशा सर्वांच्या किमती यामुळे वाढलेल्या आहेत.
पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये मागील चार महिन्यांपासून झालेल्या ढीमुळे आता वाहतुकीचा खर्चदेखील वाढला आहे. त्याचा थेट परिणाम बाजारातील सर्व वस्तूंच्या दरांवर होत आहे.
पेट्रोल प्रतिलीटर
१ नोव्हेंबर ८७.७४ रू.
१ डिसेंबर ८९.०२रू.
१ जानेवारी ९०.३०रू.
१ फेब्रुवारी ९३. ४९रू.
डिझेल प्रतिलीटर
१ नोव्हेंबर ७६.८६ रू.
१ डिसेंबर ७८.९७ रू.
१ जानेवारी ८०.५१ रू.
१ फेब्रुवारी ८३.९१ रू.
कंपनीने कोरोनामुळे पगारात कपात केली आहे. शासनाने पेट्रोल डिझेलचे भाव वाढविल्यामुळे बाइकमधील पेट्रोल परवडत नाही. मी बाइक खरेदी केली त्यावेळेस पेट्रोलचा दर ६० रुपये लीटर होता. मात्र आता पेट्रोल ९० च्या पलीकडे गेल्याने गाडी विकण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. - संतोष गीते
आपल्या शेजारील देश पेट्रोल आपल्याकडून विकत घेतात. मात्र त्या देशांमधील पेट्रोलचे दर आपल्याहून कमी आहेत. केंद्र सरकार व राज्य सरकार पेट्रोलवर वाढीव कर लावून सामान्यांची पिळवणूक करीत आहे. हे कर कमी करून शासनाने पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी कराव्यात.
- योगेश माळी
आधीच मागील काही महिन्यांपासून वाढीव वीज बिल येत आहे. त्यात सिलिंडरच्या किमती दर महिन्याला वाढत आहेत. यामुळे घर खर्च चालविणे कठीण होऊन बसले आहे. सरकारने सामान्य माणसाची पिळवणूक थांबवायला हवी.
- अनिता पाटील
गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये वाढ
घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतींमध्येदेखील तब्बल १२५ रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे गृहिणींना चिंता सतावू लागली आहे. महागाई अजून किती रडविणार महागाई कमी करण्यासाठी पावले उचलणार आहे का, असा सवाल सर्वसामान्य उपस्थित होत आहे.