डॉ. शैलेश उमाटेमानसोपचारतज्ज्ञ
स्मार्टफोन वापरणारी व्यक्ती दररोज ६ ते ७ तास मोबाइलवर वेळ घालवत असते. साधारणतः भारतात सरासरी स्क्रीन टाइम ५ ते ६ तास आहे. ते (स्क्रीन टाइम) दरवर्षी वाढत चाललेले आहे. सध्या आपण अमेरिकेतील लोकांपेक्षा जास्त काळ मोबाइल वापरतो. बरेच लोक स्क्रीन रात्री किंवा सायंकाळी वापरत असतात. त्यातील ब्लू लाइटमुळे निद्रा-चक्र बिघडते. झोपेची हार्मोन, मेलॅटोनीन, याचा स्राव कमी झाल्याने निद्रा सुखद आणि गाढ होत नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी थकवा येणे, कामात लक्ष न लागणे इत्यादी दुष्परिणाम होतात. तसेच डोळ्याला थकवा आणि ताण येतो. बराच काळ स्क्रीनसमोर राहिल्याने, बरीच अनावश्यक माहिती मिळते ज्यातून काही फायदा न होता ताण वाढतो. मोबाइलवर आपण फक्त पाहत असतो. त्यामुळे विचार करण्याची कुवत कमी होते. कल्पनाशक्ती कमी होते. बुद्धी कमजोर होते. याउलट एखादे पुस्तक वाचल्याने, ते वाचून त्यातील प्रसंगानुसार तसे दृश्य, स्मृतिपटलावर तयार होतात. त्यामुळे कल्पनाशक्ती वाढते.स्क्रीन टाइम जास्त असल्याने, मनुष्य एकाकी पडतो. तो एकटाच मोबाइल विश्वात स्वच्छंद भ्रमण करतो. एकाकीपणा वाढतो. त्यातून निराशा निर्माण होते. खरे तर एवढ्या स्क्रीन टाइममध्ये काहीच सुपीक असे होत नाही.
पंतप्रधान मोदींनी, स्क्रीन टाइम कमी करण्याचा सल्ला परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात विद्यार्थ्यांना दिला. खरेच स्क्रीन टाइम कमी केल्याने बरेच फायदे होतात. स्क्रीन नसल्याने आपण समोरच्या व्यक्तीशी गप्पा मारू शकतो. त्यामुळे बांधिलकी निर्माण होते. जिव्हाळा जाणवतो. एकटेपणा टळतो. खरे तर प्रत्येकाने स्क्रीन टाइम १ ते २ तासांच्या आत ठेवला पाहिजे. तो कमी करण्यासाठी, आधी किती स्क्रीन टाइम होतो हे मोजा. तो कशासाठी वापरला ते पाहा. मग टाइमपास ॲप बंद करा. नोटिफिकेशन बंद करा. दिवसातून ज्यावेळी जास्त मोबाइल वापरला जातो, त्यावेळी शारीरिक व्यायाम किंवा मैदानी खेळाला सुरुवात करावी. कुटुंबीयांशी आणि मित्रांशी संवाद साधावा. स्क्रीन फ्री जागा नेमावी. रोज सकाळी वा सायंकाळी १ ते २ तास, व्यायाम करताना किंवा फॅमिली टाइम, मुलाबरोबर वा आप्तेष्टांबरोबरचा वेळ घालवताना फोन/ स्क्रीन जवळ ठेवू नये. कोणी फोन किंवा मेसेज केला तर त्यांना नंतर उत्तर द्यावे. समोरील व्यक्तीशी फोन किंवा मेसेजवर संवाद साधण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटून बोलावे.