मुंबई : पालिका प्रशासनाने नालेसफाईचे उद्दिष्ट एक आठवड्यापूर्वीच पूर्ण झाले असल्याचा दावा करत पालिकेच्या नोंदीनुसार मुंबईतील नाल्यांतून ९ लाख ८४ हजार ९२७ मेट्रिक टन म्हणजे १००.५१ टक्के गाळ काढण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. मात्र, खरेच नालेसफाई झाली का? किंवा आपल्या विभागात जर अजूनही नालेसफाई झाली नसेल तर त्याची तक्रार नेमकी कुठे करायची, नालेसफाईबाबत माहिती कुठे समजेल, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मुंबईकरांना मिळेनाशी झाली आहेत. कारण, २२ मेपर्यंत हेल्पलाइन क्रमांक किंवा तशी यंत्रणा उपलब्ध करून देण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनांनाच पालिकेने बगल दिल्याचे समोर आले आहे. आठवडा उलटूनही पालिकेने यंत्रणा उपलब्ध करून दिलेली नाही.
मुंबईतील नालेसफाई ‘३१ मे डेडलाइन’च्या आठवडाभर आधीच पूर्ण झाल्याचे पालिका प्रशासनाने गुरुवारी जाहीर केले. पालिकेने निश्चित केलेल्या ९ लाख ७९ हजार ८८२ मेट्रिक टन गाळपैकी गुरुवारी दुपारी १२ वाजेपर्यंत ९ लाख ८४ हजार ९२७ मेट्रिक टन म्हणजे निर्धारित उद्दिष्टाच्या १००.५१ टक्के गाळ काढण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली. मुंबईकरांना १ जून ते १० जूनपर्यंत आपल्या परिसरातील नालेसफाईबाबत ऑनलाइन तक्रार नोंदवित येणार असून, त्यासाठी पालिका यंत्रणा उपलब्ध करून देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान, पालिकेला मुख्यमंत्र्यांच्या सूचनांचा विसर पडला की काय, असे सवाल या निमित्ताने उपस्थित होऊ लागले आहेत. गाळ काढण्याचे काम सुरू राहणार
- पालिकेने नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा केला असला तरी अनेक नागरिक अद्यापही आपल्या परिसरात नालेसफाई झाली नसल्याने त्रस्त आहेत.
- मुख्यमंत्र्यांच्या सूचनांप्रमाणे फोटो आणि व्हिडीओद्वारे त्यांना आपल्या तक्रारी पालिका प्रशासनापर्यंत पोहोचवायच्या असल्या तरी अद्याप त्यासाठी यंत्रणा उपलब्ध नसल्याने ते हतबल असल्याच्या प्रतिक्रिया ते देत आहेत.
- मुंबईच्या नाल्यांमधून गाळ काढण्याच्या कामाला ६ मार्च २०२३ रोजी सुरुवात करण्यात आली होती आणि उद्दिष्टपूर्तीपर्यंत ९ लाख ७९ हजार ८८२ मेट्रिक टन गाळ काढण्यात आला असून, यापुढेही नाल्यांतून अधिक गाळ काढण्याचे काम सुरू राहील, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे.