मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील हवामानाचे अंदाज अधिक अचूक देता यावेत, यासाठी आता हवामान खात्यातर्फे चार रडार बसविण्यात आले आहेत. विलेपार्ले, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, पनवेलमध्ये बसविण्यात आलेल्या या रडारचा परीघ ६० ते १०० किमी असून, याद्वारे पावसासह हवामानाचा अधिक
अचूक अंदाज वर्तवता येणार असल्याचा दावा हवामान खात्याने केला आहे. २ ते ३ तास अगोदर हवामानाचे अंदाज या रडारद्वारे दिले जातील.
देशभर हवामानाचे अचूक अंदाज देण्यासाठी हवामान शास्त्र विभाग काम करत आहे. यात अधिकाधिक वृद्धी व्हावी म्हणून नव्या तंत्रज्ञानाचा आधार घेतला जात आहे.
विशेषत: डॉप्लर, रडारद्वारे हवामानाचे अंदाज बांधण्यासाठी अधिक वेगाने काम केले जात आहे. त्यानुसार, चार एक्स बँड रडार बसविण्यात आले आहेत. देशभरात अर्बन रडार नेटवर्क या संकल्पनेखाली असे रडार देशभरात बसविले जाणार असून, याची सुरुवात मुंबईमधून करण्यात आली आहे.