नरेश गडेकर नाट्य परिषदेचे ‘अध्यक्ष’ कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:07 AM2021-09-18T04:07:19+5:302021-09-18T04:07:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष नक्की कोण, यावरून सध्या नाट्य परिषदेत वेगळेच नाट्य ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष नक्की कोण, यावरून सध्या नाट्य परिषदेत वेगळेच नाट्य रंगले आहे. आता प्रमुख कार्यवाह आणि पदसिद्ध विश्वस्त या नात्याने शरद पोंक्षे यांनी नाट्य परिषदेचे तहहयात विश्वस्त शरद पवार यांच्या पत्रावर, त्यांनाच एक पत्र पाठवून, नरेश गडेकर हे नाट्य परिषदेचे अध्यक्ष कसे, असा सवाल केला आहे.
नरेश गडेकर यांच्याऐवजी नाट्य परिषदेचे ‘अध्यक्ष’ म्हणून नवनाथ (प्रसाद) कांबळी व प्रमुख कार्यवाह म्हणून शरद पोंक्षे यांना पत्र पाठविणे आवश्यक असल्याचे त्यांनी शरद पवार यांना या पत्राद्वारे सूचित केले आहे.
नरेश गडेकर यांनी 'अध्यक्ष' झाल्यासंबंधीचा दाखल केलेला बदल अर्ज सहाय्यक धर्मदाय आयुक्तांपुढे प्रलंबित असल्याचे शरद पोंक्षे यांनी शरद पवार यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. आपल्या पत्रातील मजकूर चुकीच्या माहितीवर आधारित असून, तहहयात विश्वस्त शशी प्रभू, नियामक मंडळ सदस्य नरेश गडेकर व सतीश लोटके हे चुकीचा पत्रव्यवहार करून दिशाभूल करीत असल्याचेही त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.
विश्वस्त मंडळातील काही रिक्त जागांमुळे विश्वस्त मंडळाच्या कामकाजावर परिणाम होत असल्याचे पत्र नाट्य परिषदेचे तहहयात विश्वस्त शरद पवार व शशी प्रभू यांनी नाट्य परिषदेचे 'अध्यक्ष' या नात्याने नरेश गडेकर यांना दिले होते. या जागा भरण्याचे अधिकार कार्यकारी समितीच्या शिफारशीने नियामक मंडळाला आहेत आणि त्या दृष्टीने कार्यकारी समिती व नियामक मंडळाची सभा तातडीने घेण्यात यावी, असे या पत्रात नमूद केले होते.
यानंतर नरेश गडेकर यांनी, यासंदर्भातील कार्यवाही १५ दिवसांत करू, असे स्पष्ट केले होते.
यावर शरद पोंक्षे यांनी नरेश गडेकर यांना पत्र पाठवून, आपण नाट्य परिषदेचे अध्यक्ष असल्याच्या संदर्भात कोणतेही आदेश सहाय्यक धर्मदाय आयुक्तांनी पारित केलेले नाहीत, असे कळविले होते आणि आपल्या पत्रव्यवहाराच्या संदर्भात सात दिवसांत समर्पक उत्तर देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र त्याआधीच नाट्य परिषदेच्या वतीने शरद पोंक्षे यांनी थेट शरद पवार यांना पत्र पाठविले आहे.